(नवी दिल्ली)
संसदेत महिला आरक्षण विधेयक पारित होण्यात आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात बराच फरक आहे. पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होत असल्याने, भाजपाने आरक्षण अंमलात आणण्यापूर्वीच त्याला निवडणूक मुद्दा बनविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला आहे.
हे विधेयक म्हणजे डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार आहे. गुरुवारी राज्यसभेत यावर चर्चा सुरू असताना, काँग्रेसने विधेयकात काही दुरुस्त्या सुचविल्या होत्या. त्या स्वीकारण्यात आल्या असत्या तर महिला आरक्षण पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत अंमलात आणण्याचा मार्ग मोकळा झाला असता, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विटर एक्सवर म्हटले आहे.
आमच्या दुरुस्त्यांमुळे देशातील ओबीसी तसेच अनुसूचित जाती व जमातीमधील महिलांनाही आरक्षण मिळाले असते. मात्र, सरकारला ते मान्य नव्हते आणि म्हणूनच आमच्या दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या. यामुळे भाजपाचा खरा उद्देश उघडकीस आला आहे. प्रत्यक्षात आरक्षण लागू करण्यासाठी मतदार संघांची पुनर्रचना करण्याची काहीच आवश्यकता नाही, असा आरोप रमेश यांनी केला. ही संपूर्ण प्रकि‘या आगामी लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा बनविण्यासाठी आहे. आरक्षण प्रत्यक्षात अंमलात आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छाच नाही, असेही रमेश यांनी म्हटले आहे.