(आरोग्य)
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलेला अभ्यास आणि वैद्यकीय अहवालांनुसार २० ते ३५ वयोगटातील तरुण स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सचे प्रमाण वाढले आहे. यात तीव्र वेदना, मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव आणि काही प्रमाणात प्रजनन समस्या उद्भवू शकते. गर्भाशयाच्या फायब्रॉइड्समुळे स्त्रीच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी ही एक चिंतेची बाब ठरत असल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
करिअरला प्राधान्य देणे, उशीर होणारे लग्न आणि उशिराने होणारी गर्भधारणा यासारख्या कारणांमुळे फायब्रॉइड्समध्ये वाढ झाली आहे. कामाचा वाढता व्याप, वाढलेला तणाव आणि जीवनशैलीतील बदल हे फायब्रॉइड प्रकरणांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरतात. लक्षणे जाणवताच त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्वरित उपचार घेणे ही काळाची गरज आहे. गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स ज्याला ‘लेओमायोमास’ किंवा ‘मायोमास” देखील म्हणतात.
महिलांमध्ये गर्भाशयातील फाइबॉईडची समस्या वाढताना दिसून येत आहे. परंतु, महिला अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांच्या भविष्यातील प्रजननक्षमतेबवर परिणाम होऊ शकतो. मासिक पाळी दरम्यान अतिरिक्त रक्तस्त्राव जाणवू लागल्यानंतर डॉक्टरांकडे येतात. त्यानंतर सोनोग्राफी चाचणीत गर्भाशयात गाठी असल्याचं निदान होता. गर्भाशयात फायब्रॉईड असणाऱ्या साधारणतः ३-४ महिला बाह्यरूग्ण विभागात उपचारासाठी आलेल्या दिसून येत आहेत. या फायब्रॉईडमुळे वंधत्व येत नाही. मात्र अकाली प्रसूती आणि गर्भपात होण्याचा धोका सर्वांधिक असतो.
दीर्घकालीन प्रजनन समस्या टाळण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार करणे गरजेचे आहे. महिलांना मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होणे, ओटीपोटात वेदना होणे किंवा गर्भधारणेच अडचणी येणे यासारखी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा असे तज्ञ सांगतात. फायब्रॉइड्स हे एकापेक्षा जास्त असू शकतात, ‘बी’च्या आकारापासून ते खरबुजाच्या आकारापर्यंत वाढू शकतात. गर्भाशयाचे फायब्रॉइड्स प्राणघातक नसतात. परंतु, ते अस्वस्थता निर्माण करू शकतात आणि जास्त रक्तस्रावामुळे लाल रक्तपेशी (अॅनिमिया) नष्ट झाल्यामुळे थकवा येऊ शकतो. शिवाय महिलांना नैराश्य, चिंता, तणाव आणि भीतीचाही सामना करावा लागू शकतो.
फायब्रॉइड्समुळे अनेकदा यशस्वी गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे गर्भधारणेत अधिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही गरोदर राहण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला फायब्रॉइड्सची समस्या असेल तर डॉक्टर किंवा वंध्यत्व निवारण तज्ञ तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. फायब्रॉइड्स असलेल्या महिलांना त्वरीत उपचार घेता येतात मात्र यासाठी महिलांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.
गर्भाशयातील सिस्ट्समुळे बर्याचदा अधिक रक्तस्त्राव होणे, ओटीपोटात वेदना होणे आणि अनियमित मासिक पाळीची समस्या सतावते, लैंगिक संभोगाच्या वेळी ओटीपोटात असह्य वेदना होतात, पाठदुखी, गर्भधारणेत अडचणी येणे आणि गर्भपात ही देखील गर्भाशयाच्या फायब्रॉइडची लक्षणे आहेत. हल्ली २० ते ३५ वयोगटातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सचे प्रमाण दिसून येते.
सामान्य लक्षणे
सर्वच स्त्रियांना लक्षणे जाणवतील असे नाही. परंतु, सामान्य लक्षणांमध्ये मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव, ओटीपोटात वेदना, वारंवार लघवी होणे, मूत्राशयावर दाब येणे, गुदाशयात वेदना होणे, कंबर दुखणे, बद्धकोष्ठता, पोटात गोळा येणे, सात दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणारी मासिक पाळी, रक्ताच्या गुठळ्या आणि अति रक्तस्राव यांचा यामध्ये समावेश होतो.
ही आहेत प्रमुख कारणे
संप्रेरकांमधील असंतुलन – ‘एस्ट्रोजेन” आणि ‘प्रोजेस्टेरॉन” मासिक पाळीचे नियमन करणारे संप्रेरकामुळे फायब्रॉइड वाढतात.
आनुवंशिक स्थिती – फायब्रॉइडच्या विकासासाठी आनुवंशिक घटकही कारणीभूत ठरु शकतात.
जीवनशैली आणि आहार – लठ्ठपणा आणि लाल मांसाचे प्रमाण जास्त आणि फळे आणि भाज्यांचे सेवन कमी करणे यासारख्या घटकांमुळे धोका वाढू शकतो.
वैद्यकीय इतिहास – गर्भधारणा उशिरा होणे, यामुळेही फायब्रॉइड्सचा धोका वाढू शकतो.