(खेड / भरत निकम)
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक महीलांना शिलाई मशीन आणि घरकुल योजनेतील रक्कम देतो, असे सांगून लाखोंची रक्कम घेऊन पोबारा केलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेचा युवा अध्यक्ष संदीप डोंगरे याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र क्रांती सेना संस्थेच्या नावे केंद्र सरकारच्या विविध योजनांचे काम करतो, असे सांगून श्रमकार्ड स्किममधून बाजारात १२ हजार किंमत असणारी शिलाई मशीन मोफत तसेच घरकुल योजनेच्या १ लाख २० हजारांची रक्कम थेट खात्यात जमा करण्यात येईल. याप्रकारच्या कामासाठी संस्था कर्मचारी पगार व प्रवास खर्च यासाठी शिलाई मशीन घेणारांकडून २ हजार आणि घरकुल योजनेच्या कामासाठी १० हजार इतकी रक्कम जमा करुन घेतली आहे. ही रक्कम जमा करण्यासाठी संस्थेकडून दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले गेले आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या रक्कमेची आकडेवारी ही कोटींच्या घरात जातं आहे. पैसे जमा झाल्यानंतर शिलाई मशीन मिळणार, या आशेवर अनेक महिला प्रतिक्षा करत होत्या. त्यानंतर महाराष्ट्र क्रांती सेना संस्थेकडे संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच वारंवार प्रयत्न करुनही काहीही उपयोग झाला नाही. शेवटी सर्वांची फसवणूक झाली, असे लक्षात आले होते. त्यानंतर प्रथम खेड पोलीस ठाण्यात ८३९ महीलांची तब्बल २१ लाख १८ हजार रक्कमेची फसवणूक झाली, अशी तक्रार दाखल केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात ही फसवणूक झाली असून या शिलाई मशीन व घरकुल योजना घोटाळा प्रकरणी शीघ्र गतीने पोलीस तपास व्हावा, अशी मागणी फसवणूक झालेल्या महीलांच्या नातेवाईक मंडळींकडून करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी याप्रकरणी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.