( रत्नागिरी / प्रतिनिधी)
नोकरी डॉट कॉम कंपनीतून अधिकारी बोलत असल्याचे सांगून आपल्याला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाला साडेबारा लाखाला दंडा घातल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील देवुड येथे घडली आहे. ही घटना ही घटना 9 डिसेंबर 2022 ते 3 फेब्रुवारी 2023 दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद राहुल देवजी खापले (देवूड चींचवाडी, रत्नागिरी) याने रत्नागिरी सायबर पोलिसात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल खापले याच्या मोबाईलवर 9 डिसेंबर 2022 रोजी रोशन सिंग नावाच्या अनोळखी व्यक्तीने फोन केला. नोकरी डॉट कॉम या कंपनीतून अधिकारी बोलत असल्याचे सांगून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी तुम्हाला काही रक्कम द्यावी लागेल असे सांगून महिंद्रा कंपनीचे अकाऊंट नंबर देतो असे सांगितले. त्यानुसार त्या व्यक्तीने हितेश रजपूत नाव्याच्या व्यक्तीचा अकाऊंट नंबर दिला. त्या नंबर वर प्रथम 2 लाख 38 हजार 888 रुपये भरायला सांगितले. त्यानंतर वेळोवेळी कार्तिक, समंथा, अभिषेक, राजेश्वर अशा वेगवेगळ्या नावांनी फोन करून पैसे उकळले. आपल्याला डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या पदासाठी नोकरी दिली जाईल असे आमिष दाखवले. 3 जानेवारी 2023 पर्यंत 12 लाख 40 हजार 739 रुपयांची फसवणूक केली. आपल्याला नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल याने पोलिस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादवी कलम 419, 420, 465, 34 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 नुसार गुन्हा दाखल केला आहे.