(मुंबई)
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार वीज ग्राहकांनी छापील वीज बिलाच्या कागदा ऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना ‘प्रॉम्प्ट पेमेंट’चा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे. गो-ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे कळविण्यात आले आहे.