(वेळणेश्वर / उमेश शिंदे)
जलजीवन मिशन वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही 2024 हे वर्ष निर्धारित केले आहे. राजकीय दुराग्रहामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना जलजीवन मिशनवर काम झालेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जलजीवनच्या कामांचा सातत्याने आम्ही आढावा घेत आहोत. अशी माहिती जलशक्तीचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छता अभियानातील शौचालयांची निर्मिती, प्रत्येक घरात वीज, गॅस जोडणी, प्रत्येक घरात स्वच्छ पाणी हे सगळे विषय राज्यांचे आहेत. असे असले तरी देशातील जनतेच्या मुलभूत प्रश्र्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विषय हातात घेतले. प्रत्येक घरात वीज, गॅस जोडणी, शौचालय या सुविधांसाठी पंतप्रधानांनी सुनियोजित योजना आखुन त्या वेळेत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट सर्वांसमोर ठेवले. त्यामुळेच आज देशातील खेडोपाड्यातील जनतेला या सुविधा मिळाल्या. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक कुटुंबाला शुध्द पाणी मिळाले पाहीजे म्हणून जल जीवन मिशनची योजना तयार झाली. 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात पाणी मिळण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले. स्वच्छ पाणी मिळण्यासाठी पाण्याच्या तपासणी करणाऱ्या 2000 प्रयोगशाळा आपण तयार केल्या. आता तर ग्रामपंचायत स्तरावर कमित कमी पाच महिलांना पाणी तपासण्याचे प्रशिक्षण आपण देत आहोत. त्यांना पाणी तपासण्याचे कीट दिले जाणार आहे.
गावातील प्रत्येक घरात पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी तपासले जावे अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. या सर्व योजना केंद्र सरकारने तयार केल्या. त्यांची कार्यवाही राज्य सरकारने करणे आवश्यक आहे. योजनांचा आढावा घेणे ही आमची जबाबदारी आहे. आमच्या पोर्टलवर योजनांच्या प्रत्येक टप्प्याचे संख्यात्मक वृत्त राज्य सरकारकडून दिले जाते. 2020 मध्ये लक्षद्विप, पॉण्डेचरी, अंदमान निकोबार, गोवा, तेलंगणा, हरियाणा या राज्यांनी वेळेपूर्वी जलजीवनचे काम पूर्ण केले.
2019 मध्ये जलजीवन मिशन सुरु झाले तेव्हा महाराष्ट्रातील 38 टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोचले होते. देशांतील दुसऱ्या कोणत्याही राज्यात इतके काम झालेले नव्हते. मात्र राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने राजकीय दुराग्रहामुळे या योजनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महाराष्ट्र आज देशात मागे पडला आहे. आज महाराष्ट्रात जल जीवनचे काम फक्त 66 टक्केवर पोचले आहे. जूनपर्यंत अधिकांश ठिकाणच्या पाणी योजना सुरु होतील. तर प्रगतीपथावर असलेले प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होतील. असे महाराष्ट्र सरकारने आश्र्वस्त केले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील पश्चिम घाटामध्ये पावसाचे पाणी अडविण्यासाठी येथील राज्य सरकार एक मोठी योजना तयार करत आहे. सर्वसामान्य जनतेला पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारने जल जीवन मिशन योजना निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण कराव्यात यासाठी मी शुभेच्छा देतो.