(मुंबई)
राज्यपालांची महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये, कर्नाटककडून महाराष्ट्रातील गावांवर करण्यात येणारा दावा तसेच सत्ताधाऱ्यांकडून महिला नेत्यांवर वेळोवेळी होणारी अश्लील शेरेबाजी याविरोधात महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या १७ डिसेंबर रोजी भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बेकायदेशीर व शिवसेना पक्षाशी गद्दारी करून आलेल्या या सरकारमुळे राज्याची अस्मिता धोक्यात आली आहे. तर राज्यपाल महापुरुषांवर बेताल वक्तव्ये करत आहेत. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गावांवर दावा केला जात आहे. गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातील महत्वाचे उद्योग गुजरातला पळवले. पुढच्या वर्षी कर्नाटकची निवडणूक असल्याने राज्यातील उद्योग आणि गावे आता कर्नाटकला नेणार का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला आहे.
राज्यपाल कोश्यारींना पदमुक्त केलं तरी हा मोर्चा होणारच, असा निर्धार राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. हा विषय केवळ राज्यपालांच्या वक्तव्याचा नाही तर राज्यात आता नवीन सरकार आल्यापासून सीमाभागातील गावांकडून दुसऱ्या राज्यात जाण्याची मागणी केली जात आहे, हे या आधी कधीही घडलं नव्हतं असं अजित पवार म्हणाले.