(खेड)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खेडच्या वतीने प्रतिवर्षी गुणवंत विद्यार्थी तसेच गुणवंत शिक्षक, आदर्श शाळा यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. या वर्षीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे हा सोहळा शिक्षक संघाचे नेते बाबाजी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा नेते प्रमोद मोहीते, संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक नागवेकर, सचिव दीपक मोने, शिक्षक पतपेढीचे संचालक संतोष उतेकर, तालुका नेते विलास धामणे, अध्यक्ष राजेंद्र चांदिवडे व शिक्षण विस्तार अधिकारी संतोष भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक खेड संघाचे अध्यक्ष राजेंद्र चांदिवडे यांनी केले. यावेळी प्राथमिक शिक्षकांचे इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्तीधारक पाल्य, नवोदय निवड,10 वी,12 वी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण, बी डी एस, एम टी एस परीक्षा, मंथन, ऑलिम्पियाड तसेच इतर तत्सम परीक्षा, जेईई, नीट निवड, मेडिकल शिक्षण पूर्ण, इंजिनियरिंग झालेली, वकील झालेली मुले, यांचा तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शाळा म्हणून पुरस्कार मिळालेल्या शाळा नांदिवली दंडवाडी व चिंचघर मेटकरवाडी, विविध क्षेत्रात पुरस्कार मिळालेले शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक त्याचबरोबर एम.ए., बी.एड्. एम.ए एज्युकेशन असे शिक्षण वाढवलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लायन्स क्लब ऑफ खेड तसेच रॉयल हॉस्पिटल भरणे यांच्या वतीने शिक्षकांसाठी मोफत हेल्थ चेक अप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 65 पेक्षा अधिक जणांचे मोफत तपासणी करण्यात आली. यासाठी डॉ.विक्रांत पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, सुरेश चिकणे यांचे सहकार्य लाभले. या गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन सरचिटणीस एकनाथ पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष सुधाकर पाष्टे व मंगेश झावरे यांनी केले. संघटनेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल लायन्स क्लबच्या वतीने शिक्षक संघाचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी गुणवंत विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.