(पाचल /तुषार पाचलकर)
दिनांक 1 जून 1978 रोजी पुणे अहमदनगर मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती, याच्या स्मरणार्थ एसटी महामंडळाकडून दरवर्षी वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. यंदा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 3 जून 2023 रोजी हा सोहळा प्रत्येक बस स्थानकात एकाच वेळी साजरा करण्यात यावा असं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार आज 3 जून 2023 रोजी, पाचल बस स्थानक येथे 75 वा वर्धापन दिन अनेक प्रवासी ग्रामस्थ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संपूर्ण बस स्थानक साफ व स्वच्छ करण्यात आलं होतं. गोंड्याची फुलं हार व रांगोळी काढून बसस्थानक सजवण्यात आलं होतं. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं बसव्यवस्थापक श्री राजेश कांबळे यांनी पेढे वाटून हा आनंद साजरा केला. यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी पाचल गावचे माजी उपसरपंच किशोर नारकर यांनी, सर्वांच्या लाडक्या लालपरीला संपूर्ण महाराष्ट्रात 75 वर्षे पूर्ण झाल्याने आजचा 75 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
या निमित्ताने पाचल बस स्थानक येथे देखील पाचल बस व्यवस्थापक राजेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करताना अनेक मान्यवरांनी या वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज शुभेच्छा देताना एवढंच सांगावंसं वाटतं की आपल्या सर्वांची लाडकी लालपरी लोकांच्या सेवेसाठी चांगल्या प्रकारे सेवा देत राहो आणि त्यांच्या सेवेला चांगल्या प्रकारे यश मिळो अश्या शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. तसेच पाचलचे जेष्ठ नागरिक प्रभाकर पाथरे यांनी 1970 च्या शतकातल्या एसटी ने प्रवास केलेल्याच्या आठवणी ताज्या करताना येरडव मुंबई ही पाचल मधून मुंबईला जाणारी पहिली एस टी बस होती. आणि त्या बस नी आपण एस टी ने पहिला प्रवास केला होता असं सांगितलं. आज एस टी मध्ये चांगल्या प्रकारे बदल झाला असल्याने आजदेखील एस टी नेच प्रवास पुन्हा पुन्हा करत रहावा अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पाचल गावचे माजी उपसरपंच किशोर नारकर, पाचलचे उद्योजक धनंजय उर्फ बाळा पाथरे, परुळे गावचे उपसरपंच बाळा सावंत, रायपाटण गावचे समाजसेवक मन्या गांगण, पाचल ग्रामपंचायत सदस्य विनायक सक्रे, पाचल चे माझी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश नारकर, राजेंद्र रेडीज, श्रीकृष्ण नारकर, सौरभ साळवी, ताम्हाणे गावचे सुनील पवार, पाचल गावचे कोतवाल अमित चिले, तुषार पाचलकर व अन्य प्रवासी, ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते.