(मुंबई)
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या मैदानात कोणताही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश शिंदे सरकारने जारी केले आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला उष्माघाताच्या घटनेमुळे गालबोट लागले आहे. उष्माघाताने मृत्यू झालेल्या श्रीसदस्यांच्या संख्येवरून विरोधकांनी सरकारवर टीका करत मृतांचा खरा आकडा लपवत असल्याचा आरोपही केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने कार्यक्रमाबाबत नवीन निर्देश जारी केल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माध्यमांना सांगितले.
रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. खारघरमधील भव्य मैदानात झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. अजूनही काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या मैदानात कोणताही कार्यक्रम घेतला जाऊ नयेत, असे निर्देश शिंदे सरकारने जारी केले आहेत. जोपर्यंत अधिक तापमान आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. तीन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जारी केलेल्या उष्णतेच्या लाटेच्या कृती आराखड्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला. तसेच अशा घटनेच्या पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने सरकारने जीआर काढला आहे. असे मंगल प्रभात लोढा म्हणाले.
मंगल प्रभात लोढा म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशी घटना घडेल, अशी कुणी एक टक्काही कल्पनाही केली नव्हती. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे काही घडले, त्याची राज्यात पुनरावृत्ती होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये, म्हणून सरकारने महत्वाचे निर्देश दिले आहेत. जोपर्यंत उन्हाची दाहकता आहे, तोपर्यंत दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुल्या जागेत कोणताही कार्यक्रम घेऊ नये. जनतेने या निर्णयाचे पालन करावे, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.