(मुंबई)
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या स्वरूपात बदल करण्याबरोबरच या पुरस्काराची रक्कम थेट १५ लाख रुपयांनी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या स्वरूपात आतापर्यंत दहा लाख रुपये दिले जात होते. या रक्कमेत वाढ करून ती २५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पुरस्कार नव्या स्वरूपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पुरस्कार समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पुरस्कारासाठी सुमारे २७ नावांचा प्रस्ताव सरकारकडं आला आहे. या नावांवरही बैठकीत चर्चा झाली. त्याशिवाय, आणखीही काही नावं नव्यानं समोर आली आहेत. या नावांवरही नव्यानं विचार करण्याच ठरलं आहे. महाराष्ट्रात अनेक कर्तबगार व्यक्तिमत्त्व आहेत. अनेकांनी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा या पुरस्कारासाठी विचार व्हावा, या दृष्टीनं सर्वंकष अशी नियमावली तयार करण्यात येणार आहे.