(रत्नागिरी)
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅंड अॅग्रीकल्चर या संस्थेच्या कोकण विभागाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन येत्या शनिवारी दि. ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथील जावकर प्लाझा येथे हे कार्यालय असून राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कार्यालयाचे शानदार उद्घाटन केले जाणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅंड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने कोकण उद्योग मंथन २०२२ (उद्योजक विकास परिसंवाद) या परिषदेचे आयोजन केल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पर्यटन समितीचे चेअरमन संतोष तावडे यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चरही उद्योजक व्यावसायीकांची शिखर संस्था गेली ९५ वर्षे महाराष्ट्रात कार्यरत आहे. या संस्थेचे मागील सहा महिन्यापासून कोकण विभागात काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळेच येथे कोकणातील पहिले कार्यालय सुरू करण्यात येत आहे. यानिमित्ताने कोकण उद्योग मंथन टीआरपी येथील अंबर हॉल येथे होणार आहे. ही परिषद निमंत्रितांसाठी होणार आहे. दुपारी २ वाजता कार्यालयाचे उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाल्यानंतर २.४५ ला वाजता उद्योजकता विकास परिसंवादाला सुरवात होईल. यामध्ये उद्योग व्यापार सत्र, उद्योग, कृषी आणि प्रक्रिया उद्योग, सेवा क्षेत्र आणि लघुउद्योग व पर्यटन अशा चार उद्योग क्षेत्रातील विषयावर सत्रे होणार आहेत.
या वेळी यु-टॉक या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरूण यशस्वी उद्योजकांची यशोगाथा उलगडली जाणार आहे. यामध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, उद्योजक आणि हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, फणसकिंग मिथिलेश देसाई, तिसऱ्या पिढीत पर्यटन उद्योजक म्हणून अद्वितीय कामगिरी करणारे दापोलीचे सागर मंगेश मोरे आणि पर्यटन, हॉटेल्स, मंगल कार्यालय यासह रत्नागिरीचा ब्रॅंड होण्यासाठी प्रयत्न करणारे मैत्री ग्रुपचे प्रमुख कौस्तुभ सावंत यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यांच्या संवादातून उपस्थित इतर उद्योजकांना प्रेरणा मिळेल.
उद्योग, व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व यशस्वी वाटचाल करत असलेल्या कोकणातील उदयोन्मुख व्यावसायीकांचा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला उद्योग जगतातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.