(मुंबई)
सध्या जगभरात कोरोनाने डोके वर काढले आहे. तर चीनमध्ये हाहाकार माजला आहे. अशात केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः गर्दीची ठिकाणे असलेल्या ठिकाणी मास्क सक्ती मास्क घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील प्रमुख देवस्थानांनी भक्तांना मास्क सक्ती केली आहे.
गणपतीपुळे मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती
रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. तेथील कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि पुजारी यांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. तर येणाऱ्या भाविकांनाही कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जेजुरीत कोरोना नियम लागू
जेजुरीत खंडेरायाच्या मंदिरातही कर्मचारी आणि अधिका-यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. भाविकांना मास्क सक्ती केली नसली तरी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्यात येईल, असेही मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.
शिर्डीतील साईबाबा मंदिरात विशेष खबरदारी
कोरोनाचा धोका लक्षात घेता आणि नवीन वर्षामध्ये भक्तांची संख्या वाढते म्हणून राज्यातील प्रसिद्ध मंदिर शिर्डीतील साईबाबा मंदिरात खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत. साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी साईबाबा संस्थानने मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरही अलर्ट
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता आता मंदिर प्रशासनाच्यावतीने ज्या भाविकांकडे मास्क नाहीत त्यांना मास्क मोफत वाटले जात आहेत. तर मंदिर परिसरात मास्क वापरा असे सूचना फलकावर लावून आवाहन करण्यात येत आहे.
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात मास्क सक्ती
कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनीकोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात नियम कडक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली असून येणाऱ्या काळात कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन भाविकांना सुद्धा मास्क सक्तीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे.
तुळजाभवानी मंदिर आणि परिसरात मास्कचे आदेश
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर मास्क सक्ती करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर आणि परिसरातही मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी मास्क हा बंधनकारक असणार आहे. मास्क सक्तीचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढले आहेत.
अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात मास्कचे वाटप
अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली आहे. मंदिर समितीने भक्तांना आवाहन केले आहे की, त्यांनी मास्क घालून मंदिरात यावे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने भक्तांना मास्कचे वाटपही केले आहे.