(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दिवाळी सणाचे औचित्य साधून उदय सामंत फाउंडेशन तर्फे महेश सामंत आणि त्यांच्या टीमने अत्यंत परिश्रमपूर्वक दामले विद्यालय रत्नागिरी येथे इंद्रधनु रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी झालेल्या रांगोळी कलाकारांचा सन्मान पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते करत त्यांच्या कलेचे कौतूक करण्यात आले.
उदय सामंत फाउंडेशन तर्फे रत्नागिरी येथील दामले विद्यालयात आयोजित इंद्रधनू रांगोळी प्रदर्शनाला रत्नागिरीकरांनी उत्तम प्रतिसाद दिला असून अनेकांनी आपला अभिप्राय नोंदवून कलाकारांच्या कलेला दाद दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातील आणि राज्यातील १९ दिग्गज रांगोळीकार यांनी सहभाग घेतला असून या सहभागी झालेल्या कलाकारांचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला.
रांगोळी प्रदर्शनात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमधीलही रांगोळीकार सहभागी झाले होते. त्या 19 रांगोळीकारांमध्ये इस्लामपूरचे अभिजीत शिवाजी सूर्यवंशी, रत्नागिरीचे निखिल निलेश कांबळे, गौरव रमेश सुर्वे, वेंगुर्ला येथील तेजस मंगेश गोसावी, खेड येथील कौस्तुभ नरसिंह सुतार, पुण्याचे योगेश चंद्रकांत पाटील, दापोलीचे प्रवीण यशवंत वेळनसकर, इस्लामपूरचे सचिन नरेंद्र अवसरे, कुडाळ येथील केदार सखाराम टेमकर, देवरुखचे रोहित राजू कोकरे, विलास विजय रहाटे, दापोलीचे गुरुप्रसाद पांडुरंग देवधरकर, खेडचे राहुल संतोष सुतार, देवरुखचे अक्षय शिवाजी वहाळकर, रत्नागिरीचे साई दीपक सनगरे, मालगुंड रत्नागिरीचे राहुल दत्ताराम कळंबटे, उमरे रत्नागिरी येथील राज दत्ताराम कांबळे, रत्नागिरीची समिधा समीर रसाळ, पावस रत्नागिरीचे अजय प्रकाश पारकर यांचा समावेश आहे. या सर्व रांगोळीकारांचा पालकमंत्री ना. उदय सामंत आणि मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले राजकारणाचा स्पर्श न करता उदय सामंत फाउंडेशन नावारुपाला येईल असा शब्द दिला. समाज उपयोगी काम उदय सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून केले जातेय याचा मला अभिमान आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले तसेच जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रामधील रांगोळी कलाकारांना राज्यात व्यासपीठ मिळवून देणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले .मेहनती मागे इच्छाशक्ती असणे गरजेचे असल्याचे सांगत पालकमंत्री उदयजी सामंत यांनी रांगोळी कलाकारांचे कौतुक केले. रत्नागिरीच्या इंद्रधनु रांगोळी प्रदर्शन स्पर्धेचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
यावेळी ज्येष्ठ रांगोळीकार कृष्णा जाधव, प्रसन्नशेठ आंबुलकर, प्रशांत राजीवले रांगोळीकार, सुनील उर्फ दादा वणजू, राजेश सोहोनी, उदय गोखले, राहुल कळबंटे, सिद्धेश वैद्य, नगरपालिकेचे मुख्यअधिकारी तुषार बाबर, शिवसेनेचे तसेच युवा सेनेचे पदाधिकारी, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदय सामंत फाउंडेशनचे महेश सामंत आणि त्यांचे सहकारी सिद्धेश वैद्य, रजनीश परब, प्रथमेश साळवी, पूर्वा पेठे, विद्या विचारे, मानसी साळुंखे, समीर इंदुलकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरीत्या केले.
युवा सेनेची पूर्ण टीम रांगोळी प्रदर्शन रत्नागिरीकरांपर्यत पोचवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करत असून प्रत्येक कार्यकर्ता एक तास वेळ याठिकाणी देत आहे. युवा सेनेची टीम काम करत असताना हे रांगोळी प्रदर्शन रत्नागिरीकरांपर्यत पोहचावे यासाठी काम करत असून ही बाब कौतुकास्पद आहे.