(मुंबई)
महाराष्ट्रामधून गेल्या ३ महिन्यात तब्बल ३५०० पेक्षा जास्त महिला आणि मुली बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरच बेपत्ता महिलांची संख्या देण्यात आली आहे. पण याचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप समोर आले नाही.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी माध्यमांना सांगितले की, अनेक दिवसांपासून महिला आणि मुली बेपत्ता होण्याची संख्या वाढत आहे. याबाबत महिला आयोगासमोर अहवाल, उपाययोजना सादर करा अशा सूचना दिल्या होत्या. आयोग कार्यालयात याबाबत सोमवारी सुनावणी पार पडली. याबाबत अहवाल जरी सादर केला असला तरी याला रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम नाही, अशी भूमिका रुपाली चाकणकर यांनी मांडली आहे.
१ जानेवारी ते ३१ मार्चची आकडेवारी पाहिली तर ३५९४ महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. फक्त टीका करून हे प्रकरण मार्गी लागणार नाही, गृहमंत्र्यांनी यावर ठोस उपाययोजना कराव्यात. पुणे, पिंपरी चिंचवड येथील ८२ कुटुंबातल्या महिला आणि मुली बेपत्ता आहेत. राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत, असे चाकणकर म्हणाल्या.