(मुंबई)
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून राज्य सावरल्यानंतर मास्कची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने राज्यात पुन्हा मास्क सक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळत आहे.
येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र राज्य टास्क फोर्स’च्या सदस्यांची विशेष बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर टास्क फोर्सच्या सदस्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यात आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा एक प्रस्ताव सादर केला. ज्यात प्रामुख्याने राज्यात मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेता मास्कचा वापर आवश्यकच असून किमान बंदिस्त ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करावे, असे टास्क फोर्स सदस्यांचे म्हणणे आहे. विशेषतः चित्रपटगहे, नाट्यगृहे, मॉल्स अशा ठिकाणी संसर्गाचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी मास्कसक्ती करावी, असे मत या सदस्यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर खासगी आणि सरकारी रुग्णालयातही तातडीने मास्कचा वापर प्राधान्याने सुरू करण्याविषयी सूचना देण्यात आल्याचे कळते. या बैठकीत टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी तसेच इतर सदस्य उपस्थित होते.