(मुंबई)
भाषावार प्रांत रचनेची मागणी झाल्यानंतर, अनेक आंदोलने झाली आणि नवीन भाषावार प्रांतरचना झाली. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली. ०१ मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचा नवीन मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य तयार झाले. त्यानंतर तब्बल 20 वर्षांच्या कालखंडात म्हणजेच तब्बल दोन दशकात आणखी दहा नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. मात्र आजही आणखी काही जिल्हे तयार करण्याची मागणी होत आहे.
वास्तविक महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील एका शेवटच्या टोकावरील गावातील नागरिकांना जर जिल्हा मुख्यालयाला भेट द्यायची असेल तर त्याला संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो. यामुळे नागरिकांच्या वेळेची व पैशाची हेळसांड होते. जिल्ह्याची कामे करण्यासाठी नागरिकांना तब्बल एक ते दोन दिवस खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत खेड्यापाड्यातील नागरिकांना देखील जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी सुलभ व्हावी. या पार्श्वभूमीवर राज्यात एकूण 22 नवीन जिल्हे तयार करण्याचे नियोजन प्रस्ताव आहे. या 22 जिल्ह्यांची मागणी शासनाकडे प्रस्तावित आहे.
पहिले 26 जिल्हे
भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्रात 26 जिल्हे तयार करण्यात आले. यामध्ये ठाणे, कुलाबा (रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आताचे नाव चंद्रपूर) या जिल्ह्यांचा समावेश होता.
यानंतर मग गरजेनुसार आणि मागणीनुसार नवीन जिल्ह्यांची निर्मिती शासनाच्या माध्यमातून करण्यात आली. तब्बल दोन दशकांच्या म्हणजेच वीस वर्षांच्या काळात महाराष्ट्रात नवीन 10 जिल्हे तयार झालेत.
- रत्नागिरीचे विभाजन झाले आणि सिंधुदुर्ग हा नवा जिल्हा तयार झाला.
- छत्रपती संभाजी नगरचे विभाजन झाले आणि जालना हा नवा जिल्हा तयार झाला.
- धाराशिव जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवा लातूर जिल्हा तयार झाला.
- चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवा गडचिरोली जिल्हा तयार झाला.
- बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन झाले आणि मुंबई उपनगर हा जिल्हा तयार झाला.
- अकोला जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवा वाशिम जिल्हा तयार झाला.
- धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि आदिवासीबहुल नंदुरबार जिल्हा तयार झाला.
- परभणी जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवीन हिंगोली जिल्हा तयार झाला.
- विदर्भातील भंडारा या जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवा गोंदिया जिल्हा तयार झाला.
- ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा बनला.
22 प्रस्तावित जिल्हे
- नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
- अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन जिल्हे नव्याने तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
- ठाणे जिल्ह्याचे आणखी विभाजन करण्याचा प्लॅन असून मीरा-भाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे.
- ठाणे जिल्ह्यातून तयार झालेल्या पालघर जिल्ह्याचे देखील विभाजन करण्याचा प्लॅन आहे. जिल्ह्याचे विभाजन करून जव्हार हा नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
- पुणे जिल्ह्यातून शिवनेरी जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
- रायगड मधून महाड जिल्हा तयार केला जाणार आहे.
- सातारा जिल्ह्यातून माणदेश जिल्हा तयार केला जाणार आहे.
- रत्नागिरी मधून मंडणगड जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
- बीडमधून आंबेजोगाई जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
- लातूर मधून उदगीर जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
- नांदेड मधून किनवट जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
- जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव जिल्हा तयार होणार आहे.
- अमरावती जिल्ह्याचे विभाजन होईल आणि अचलपूर हा नवीन जिल्हा तयार होणार आहे.
- यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा नवीन जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
- भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली हा नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
- चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन प्रस्तावित असून यातून चिमूर हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
- गडचिरोली यादेखील जिल्ह्याचे विभाजन करणे प्रस्तावित असून यातून अहेरी हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.