(मुंबई)
गेल्या काही दिवसांपासून भाजपसह काही हिंदुत्ववादी संघटनांनी लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोवंश हत्याबंदी कायद्याच्या मागणीसाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. त्यानंतर आता भाजपच्या या आंदोलनांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. भाजप ज्या मार्गानं जात आहे, त्या मार्गानं आम्हाला जायचं नाहीये. धर्माचा वापर करून लोकांची दिशाभूल करण्याचं राजकारण केलं जात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा आहे, मग भाजप हा कायदा देशभरात का लागू करत नाही?, म्हणजे महाराष्ट्रात गायीला माता म्हणायचं आणि शेजारच्या राज्यात गायींना खाता?, हे कोणतं हिंदुत्व आहे?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. मुंबईतील मीरा-भाईंदर येथील जैन मंदिराला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, बाळासाहेब म्हणायचे की, आम्ही २५ वर्षांपासून भाजपसोबत मित्र म्हणून राहिलेलो आहे. परंतु भाजप सध्या ज्या मार्गानं जात आहे त्या मार्गानं आम्हाला जायचं नाहीये. आम्ही जे स्वप्नं पाहिलं होतं, ते तोडून-मोडून टाकलं जात आहे. धर्मावरून लोकांची दिशाभूल करणारं राजकारण भाजपकडून सुरू असल्याचं सांगत ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात गुरुंना विसरणारी लोकं तयार झाली आहेत, गुरू आणि वडीलचोर लोकं असली तरी संस्कार कुणी चोरू नयेत. संस्कार हे जन्मजात असावे लागतात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
कोणत्याही संकटाला मी कधीही संकट मानत नाही. संकटातही संधी शोधण्याचं काम मी करत असतो. कारण जो मर्द असतो त्याला संकटात लढण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळं विरोधक ताकदवान असेल तर लढण्यास आणखी हिंमत येते. त्यामुळं आम्ही ही लढाई जिंकणारच, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.