(खेड / प्रतिनिधी)
महाराष्ट्रात वर्षभर कबड्डीचा खेळ रसिकांना पहाता यावा म्हणून महाराष्ट्रात बंदिस्त क्रीडा संकुल उभारण्याकरीता प्रयत्न करणार, असे प्रतिपादन खासदार व राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष गजानन किर्तीकर २३व्या कबड्डी दिन पुरस्कार वितरणाप्रसंगी काढले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ने ठाणे जिल्हा कबड्डी असो. च्या सहकार्याने कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त या सोहळ्याचे आयोजन केले होते. ते पुढे म्हणाले की, कॉर्पोरेट कंपन्यांचा सी.आर.एस.फंड हा खेळासाठी वापरण्याकरीता असतो. कबड्डी संघटनांनी हा मिळविण्याकरीता प्रयत्न करावयास हवेत. तर ७०वी पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रातील अहमदनगर येथे घेण्याकरिता प्रयत्न करू असे राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे म्हणाले. या कार्यक्रमास कबड्डी रसिकांनी व पुरस्कार विजेत्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. पण मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे मात्र रसिकांचा हिरमोड झाला.
यावर्षी सुरू करण्यात आलेला “स्व. फिदा कुरेशी ज्येष्ठ प्रशिक्षक पुरस्कार अनिल घाटे, शरद चव्हाण, सुरेश मापुसकर, राजेंद्र महाजन यांनी, तर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार म्हणून सुभाष हरचेकार, राजेंद्र काळोखे, सूरज कदम, खेड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार इक्बाल जमादार यांनी स्विकारला. किरण बोसेकर, रघुनंदन भट, लीला पाटील – कोरगावकर, वनिता पाटील – तांडेल, निलिमा साने(दाते) यांना ज्येष्ठ खेळाडू, तर नयन साडविलकर, पांडुरंग धावडे, मदन चौधरी, बबन होळकर यांना ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून सन्मानित केले गेले. चैताराम पवार, वसंत मांजरेकर, प्रकाश रेडेकर, विश्वास शिंदे, शंकर बूढे, रोहिणी अरगडे, शहाजान शेख यांना ज्येष्ठ पंच म्हणून गौरविण्यात आले. स्व. रमेश देवाडिकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ता ठरले रतन पाटील, धर्मा सावंत. राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत गुणानुक्रमे पहिला ठरला तो मुंबई उपनगर जिल्हा. बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन,नांदेड व शिवशक्ती महिला संघ, मुंबई शहर हे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद मिळविणारे पुरुष व महिला संघ ठरले.
खेड तालुक्यातील संगलट गावचे ज्येष्ठ पत्रकार इकबालभाई जमादार यांनाही शनिवारी संध्याकाळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनकडून ठाणे येथे गडकरी रंगायतन हॉल येथे ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांचा अमृत कलश तसेच शाल देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनकडून रत्नागिरी जिल्ह्यातून इकबाल जमादार यांची निवड करण्यात आली होती. त्यांचा सन्मान अनेक मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. सुमारे 25 वर्षापासून इक्बाल जमादार हे पत्रकार क्षेत्रामध्ये उत्तम कर्तव्य बजावत असताना याबाबतची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
खासदार व राज्य कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष गजानन किर्तीकर, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार आनंद परांजपे, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे, उपाध्यक्ष व अर्जुन पुरस्कार शकुंतला खटावकर, ठाणे जिल्हा कबड्डी असो.चे अध्यक्ष कृष्णा पाटील, कार्याध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार योगेश पाटील व राम भोईर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याचे सूत्र संचलन किशोर गावडे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत करून रसिकांची दाद घेतली. “गर्जतो मराठी” या वाद्यवृदांने देखील आपल्या सुमधुर आवाजाने व नृत्याने क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केले. कृष्णा पाटील उभयतांनी अतिशय मेहनत घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले.