राज्यातील बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलेलं असतानाच आता राज्यात आणखी एक नवा समृद्धी महामार्ग तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सारखाच मुंबई-सिंधुदुर्ग महामार्ग तयार करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात महाराष्ट्र शासनाच्यावतीने शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नव्या महामार्गाची घोषणा केली आहे. त्यामुळं कोकणवासियांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. समृद्धी महामार्ग हा एमएसआरडीसीच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. त्यानंतर आता सिंधुदुर्ग-मुंबई हा महामार्ग देखील एमएसआरडीसीच्या माध्यमातूनच तयार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि नागपूर-मुंबई महामार्ग तयार केला, त्याच प्रमाणे आम्ही सिंधुदुर्ग-मुंबई हा महामार्ग तयार करत आहोत. सरकार कोकण प्राधिकरण तयार करत असून त्यामुळं कोकणाला समृद्ध करण्यास मदत होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोकणवासियांना आता नेहमीच शासनाच्या दारी खेटे मारावे लागणार नाही, कारण जनतेला सर्व सुविधा एकाच छताखाली देण्याचा निर्णयही आमच्या सरकारने घेतला आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच सरकार आहे. आम्ही कोकणातील निसर्गाला वरदहस्त देत असून कोकणाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. सावंतवाडीत शॉपिंग सेंटर उभारलं जात असून बांद्याला क्रीडा संकुल उभारलं जाणार जाणार आहे. चिपीत विमानतळासह मल्टीस्पेशलिटी रुग्णालयाचं काम जारी असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं काही दिवसांपूर्वीच लोकार्पण करण्यात आलं आहे. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग ते मुंबई या नव्या समृद्धी महामार्गाची घोषणा केली असल्याने कोकणवासीयांना लवकरच “अच्छे दिन” येणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.