(नवी दिल्ली)
महाराष्ट्रातील हत्ती गुजरातला घेऊन जाण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीपासून गडचिरोलीत कमालापूर येथील हत्तींच्या गुजरात राज्यातील रवानगीसाठी आता केंद्र सरकारने राज्य वनविभागाला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यानुसार कमलापूरातील ४ हत्तींसह पातानील आणि ताडोबा येथील वयोवृद्ध आणि छोटी पिल्ले मिळून तब्बल १३ हत्तींची पाठवणी गुजरातमधील जामनगर येथील राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर वेल्फेअर ट्रस्टमध्ये केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील 13 हत्ती जामनगरला पाठविण्याचा केंद्र शासनाचा निर्णय
या १३ हत्तींना विदर्भातून गुजरातेत पाठवल्यानंतर कोणतेही काम दिले जाणार नाही. हत्तींना कोणत्याही धार्मिक कार्यात वापरले जाणार नाही. हत्तींना कोणत्याही प्राणि संग्रहालयात प्रदर्शित ठेवले जाणार नाही, अशा राज्य वनविभागाने अटी लादल्या आहेत. या अटींच्या पूर्ततेच्या हमीनंतरच १३ हत्तींना गुजरातेत रवानगी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र गुजरातला डझनभरहून अधिक हत्ती दिल्यानंतर तिथून वनविभागाने स्वतंत्ररित्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला सिंह मिळवण्याच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक विचार करावा, अशीही मागणी जोर धरु लागली आहे.