मुंबई – महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांचे विविध प्रश्न व मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी मत्सव्यवसाय विभागाशी तातडीने बैठक लावण्यात येईल व हे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकराकडे आग्रह धरण्यात येईल असे आश्वासन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिले.
वेस्ट कोस्ट पर्सनीन नेट वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिका-यांनी आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची भेट घेतली. यावेळी आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. असोशिएशनच्या पदाधिका-यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन दरेकर यांना दिले. तसेच या विषयासंदर्भात देरकर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. दरेकर यांनी मच्छिमारांच्या मागण्या समजून घेतल्या व या विषयासंदर्भात तातडीने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्र्यांसमवेत बैठक लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम, १९८१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला तरीही मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर सदरच्या अध्यादेशाची प्रत अद्यापही मच्छिमार बांधवांना उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. तसेच पर्सनीन मासेमारीच्या समस्या प्रलंबित आहेत, त्याचप्रमाणे पर्सनीन मासेमारीचा कालावधी (१ ऑगस्ट ते ३१ मे) वाढविण्यासंदर्भात, महाराष्ट्र मासेमारी नौकांची संख्या मर्यादित करण्याबाबत तसेच अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील मासेमारी नौकांना डिझेल सबसिडी मिळण्याबाबतच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकारने तातडीने निर्णय घेण्याच्यादृष्टीने न्याय मिळवून देण्याची मागणी वेस्ट कोस्ट पर्सनीन नेट वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिका-यांनी आज प्रविण दरेकर यांच्याकडे केली.
महाराष्ट्राच्या किना-यावरील ट्रॉलिंग, डोलनेट,गिलनेट, पर्ससीन नेट व अन्य सर्व मासेमारींचा अभ्यास करण्यात यावा अशी मागणीही दरेकर यांच्याकडे करण्यात आली. कायदयात अथवा अन्य कोठेही पारंपारिक- अपांरपारिक असे मच्छिमार बांधवांचे वर्ग नसताना व सर्वच मच्छिमार बांधव पारंपारिक असताना सदर व्यवसायातील असंघटितपणाचा फायदा घेण्यात येत आहे, असेही असोशिएनच्या पदाधिका-यांनी सांगितले.
मच्छिमारांविरुध्द केल्या जाणा-या विविध कारवाया त्वरित थांबविण्यात याव्यात अन्यथा मच्छिमारांच्या जगण्याच्या मुलभूत हक्कांवर बाधा निर्माण होऊन मच्छिमारांनाही शेतकरी बांधवांसारख्या आत्महत्या कराव्या लागतील अशी भीतीही यावेळी असोसिएशनच्या पदाधिका-यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी विकास सावंत, धाडस सावंत, नासिर वाघु, गणेश नाखवा, सुरेश धानू, पुष्कर भुते, किशोर नार्वेकर, अमोल शेठ, नुरुद्दीन पटेल,महेबुब फडनाईक असद साठविलकर, अजित शिंदे, उल्लेश नाखवा आदी मान्यवर उपस्थित होते.