(मुंबई)
आपण आपल्या मतदारसंघात विकास घडवून आणावा यासाठी आपण लोकप्रतिनिधींना निवडून देतो. पण तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनीधींचा पगार किती असतो याबद्दल सर्वांनाच कुतुहल असते. जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या खर्च आणि भत्त्यांची चर्चा तर कायमच होत असते. दिल्ली सरकारने विधानसभेतील आमदारांच्या वेतनात ६६ टक्क्यांनी वाढ केल्यानंतर महाराष्ट्रातील आमदारांना किती वेतन मिळते हा विषय चर्चेला आला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांना मिळणारे वेतन किती? या प्रश्नाचे उत्तर एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मिळविले आहे. या माहितीनुसार अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना घसघशीत वेतन असल्याचे समोर आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथे राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत नेवगी यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्यात आमदारांच्या वेतनाचा आकडा समोर आला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याला २ लाख ७१ हजार ९४७ रुपये एवढे निव्वळ एकूण वेतन आयकर वजा करून देण्यात येत असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. म्हणजेच आमदाराला ३२ लाख रुपयांचं वार्षिक, ५ वर्षांसाठी १,६३,१६,८२०/- रुपये इतकी रक्कम पगार म्हणून मिळते.
या माहितीत विधानसभेच्या विद्यमान सदस्यांना देण्यात येणाऱ्या एकूण वेतनामध्ये मूळ वेतन १ लाख ८२ हजार २०० रुपये, महागाई भत्ता ३४ टक्के असून तो ६९ हजार ९४८ रुपये, दूरध्वनी सुविधा भत्ता ८ हजार रुपये, स्टेशनरी आणि टपाल सुविधा भत्ता १० हजार रुपये, संगणक चालक सेवा मिळण्यासाठी भत्ता १० हजार रुपये अशी एकूण २ लाख ७२ हजार १४८ रक्कम त्यात अन्य दोन किरकोळ भत्ते मिळून विधानसभा सदस्याला निव्वळ एकूण वेतन २ लाख ७१ हजार ९४७ रुपये मिळत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आमदारांना दूरध्वनीसाठी आठ हजार रुपये मिळतात.