राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्या ऐकायला येत आहेत. तर शरद पवार भाजपशी जुळवून घेण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. सत्ताधारी शिवसेना-भाजप युती काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राष्ट्रवादीचे काही आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. जवळपास १५ ते २० आमदारांचा गट पक्षाविरोधात बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये काँग्रेसचेही आमदार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांचे नेतृत्व कोण करणार, याची चाचपणी सुरु झाली आहे. बंडखोर आमदारांमध्ये कोण असणार, याचे तर्क-वितर्क आता लढवले जात आहेत. येत्या दोन आठवड्यात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे, राजकीय सूत्रांकडून बोललं जात आहे.
सरकार कोसळल्यानंतर विरोधात बसलेल्या महाविकास आघाडीत आमदारांची घुसमट सुरू आहे. दुसरीकडे तपास यंत्रणांनी विरोधी आमदारांच्या संस्था आणि सहकारी कारखान्यांची झाडाझडती सुरु केली आहे, त्यामुळे आमदार बंडाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र ही केवळ चर्चा आहे की, खरोखरच महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच
बघू…..
आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 11, 2023
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटनंतर या चर्चा जोरदार सुरू झाल्या आहेत. त्यांनी दावा केला आहे की, ‘आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची’, असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे.
याशिवाय मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविध मुद्य्यांवर मांडलेल्या भूमिकाही चर्चेचा विषय ठरलेला आहे. ईव्हीएम मशीनविरोधात देशातील बहुतांश पक्षांनी आवाज उठवला आहे. मात्र अजित पवार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. तसेच, गौतम अदानी प्रकरणी विरोधकांनी संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसीची मागणी केली आहे. शरद पवार यांनी मात्र परस्पर विरोधी भूमिका घेतल्यानेही सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या.
अद्याप सर्वोच्च न्यायालयात एकीकडे शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. या खटल्यावर कोणत्याही क्षणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. अशावेळी जर निकाल शिंदेंच्या विरोधात लागला तर पुढे काय? भाजपाची आणखी कोंडी होणार का?, अशी चर्चा असतानाच भाजपाकडून आता बॅकअप प्लॅन तयार केला जातोय, असेही अंदाज लावले जात आहेत.