[रत्नागिरी/प्रतिनिधी]
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या क्रांतिकारी लेखणीतून व पहाडी आवाजातून भिम बुद्ध गीते लिहून शिंदेशाही घराण्याच्या तिसऱ्या पिढीला गीते पुरविणारे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गीतकार, कवी, गायक प्रबोधनकार व “बॅरिस्टर साहेब” फेम दिलराज पवार हे सध्या मेंदूच्या एका गंभीर आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर मुंबई जे. जे. हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. लवकरच त्यांच्यावर मेंदूची शत्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना हा खर्च न परवडणारा असा आहे. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन मुंबई येथील आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे (चिंचवलकर) यांनी केले आहे.
कवी, गायक दिलराज पवार हे मूळचे कोकणातील संगमेश्वर येथील रहिवासी असून भ. गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विविध भीम- बुद्ध गीते त्यांनी लिहली आहेत. महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक कै. प्रल्हाद शिंदे, गायक आनंद शिंदे, गायक मिलिंद शिंदे, गायक आदर्श शिंदे, गायक डॉ. उत्कर्ष शिंदे, गायक दिनकर शिंदे यांनी ती आपल्या पहाडी आवाजात गायली आहेत. “तेजोमय प्रकाशित झाला तिमिरात कोहिनुर भारताचा “गायक- प्रल्हाद शिंदे, “बुद्धाची ती बुद्ध प्रणाली निनादे शांती समतेची” गायक आनंद शिंदे, “महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला” गायक – आदर्श शिंदे, “भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव ” गायक – आदर्श शिंदे, “यावे मरण माझं रम्य सकाळी आणि गाता गाता माझ्या भिमाची भूपाळी’ गायक – मिलिंद शिंदे, “भीमाने केलय धर्मांतर” गायक – मिलिंद शिंदे, “धम्म सोहळा सजलाय नागांच्या नागपुरात” गायक – आनंद शिंदे, “येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं” गायक – आनंद शिंदे, “धाडा निरोप माझ्या लाडक्या भिवाला ” गायक कै. प्रल्हाद शिंदे, “लोक शाहीर – धुरंधर महायोगी युगंधर’ गायक कै. प्रल्हाद शिंदे, “इथे एक – भीमाचा पक्ष पाहिजे” गायक आनंद शिंदे, “सतरा देवात तू झालास येडा पिसा तुला जयभीमवाला म्हणू कसा” गायक – दिलराज पवार, “बीज कोकण मातीच फुलल महूच्या वनात, महु नावाच्या नगरात भिमाबाईच्या उदरात” गायक – दिनकर शिंदे, “अन्याय अत्याचार साहू कसा गम, झोप येते रमा पण मी झोपू कसा गम” गायक दिलराज पवार. सदर सर्व काही महत्त्वाची गाजलेली गीते कवी, गायक दिलराज पवार यांनी लिहिली असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायकांनी ती आपल्या आवाजात गायली आहेत व ती सर्व गाणी ऑडिओ कॅसेट रुपी आपल्याला सर्वत्र ऐकायला येतात.
प्रसिद्ध कवी, गायक दिलराज पवार हे सध्या मेंदूच्या गंभीर आजराने त्रस्त असून त्यांच्या मेंदूला आत्यावश्यक रक्तपुरवठा होत नसल्याने जे. जे. हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार सुरू आहेत. मात्र डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्याने शस्त्रक्रियेसाठी लागणार खर्च हा मोठा असून त्यांना शस्त्रक्रिया आवश्यक असून देखील ते एवढा खर्च करू शकत नाहीत. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन कवी, गायक दिलराज पवार सहयोग निधीच्या माध्यमातून त्यांच्या ७५०६३१३८३८ या फोन पे व गुगल पे नंबरवर आर्थिक योगदान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे, सिद्धार्थ साळवी, अमनकुमार आढाव, प्रेम धांदे, संगम कासारे, अशोक निकाळजे, संतोष गमरे, संदीप यादव, निलेश पवार, मंगेश जाधव यांनी केले आहे.