(नगर)
शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा केली. पीएम मोदींसोबत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांसह भाजपचे अन्य नेते उपस्थित होते. अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे जलपूजन व लोकार्पण गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
राज्य शासनाच्या स्वतंत्र ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा पहिला हप्ता काल (दि.२६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा पहिला हप्ता वितरित करून शिर्डी येथून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेचा राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले. याप्रसंगी विविध योजनांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्राच्या ‘पीएम किसान योजने’अंतर्गत ६ हजार रुपये आणि राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबाला मिळणार आहेत. राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेसाठी सन २०२३-२४ करिता ६९०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, आज या योजनेंतर्गत सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना १,७१२ कोटी रूपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण पीएम मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
#LIVE | #शिर्डी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण https://t.co/UZAlr5AmJU
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 26, 2023
लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज साईबाबांच्या आशीर्वादाने 7,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. ज्या निळवंडे धरणाची पाच दशके महाराष्ट्र वाट पाहत होता तेही आज पूर्ण झाले आहे. देश गरिबीतून मुक्त झाला पाहिजे, गरीब कुटुंबातील नागरिकांना पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे, हाच खरा सामाजिक न्याय आहे. आमचे सरकार सबका साथ, सबका विकास या मंत्रावर काम करते. आमच्या डबल इंजिन सरकारचे सर्वोच्च प्राधान्य हे गरीब कल्याण आहे. आज देशाची अर्थव्यवस्था वाढत असताना गरीब कल्याणासाठी सरकारचे बजेटही वाढत आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, आज ज्या साई संस्थानने बांधलेल्या दर्शनरांग प्रकल्पाचे उद्घाटन झाले त्या योजनांची पायाभरणी करण्याची संधी मला मिळाली. दर्शन रांग संकुल पूर्ण झाल्याने देश-विदेशातील भाविकांसाठी अतिशय सोयीचे होणार आहे. महाराष्ट्र हे अफाट क्षमता आणि शक्यतांचे केंद्र आहे. महाराष्ट्राचा विकास जितक्या वेगाने होईल तितक्या वेगाने देशाची प्रगती होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, महसुल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. साई संस्थानने बांधलेल्या दर्शनरांग प्रकल्पाचे पंतप्रधानांनी काकडी येथील कार्यक्रमातुन दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण केले. मोदी यांची ही तिसरी शिर्डी भेट होती. जवळपास वीस मिनिटे ते मंदिर व परिसरात होते.
मोदींच्या हाताला यशाचा परीस स्पर्श – मुख्यमंत्री शिंदे
गेल्या वर्षभरात घेतलेले निर्णय तुमच्यासमोर आहेत. समृद्धी, मेट्रो, 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. ते कार्य पुढे नेत आहोत. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे काम सरकार करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कामाला हात लावतात, भूमिपूजन करतात तो प्रकल्प वायूवेगाने पुढे जातो आणि पूर्ण होतो असा अनुभव आहे. त्यांच्या हाताला यशाचा परीस स्पर्श आहे. हात लावताच त्याचे सोने होते असा अनुभव आहे. म्हणून आम्ही त्यांना वारंवार बोलावतो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
कृषिमंत्री असताना “त्यांनी’ शेतकऱ्यांसाठी काय केले?
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केले गेले. राज्यातील एक वरिष्ठ नेते केंद्रात कृषिमंत्री राहिले. व्यक्तिगत मी त्यांचा सन्मान करतो; पण त्यांनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? अशा शब्दांत शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (गुरुवार) शिर्डीत त्यांच्यावर हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते कृषिमंत्री असताना 7 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी केवळ देशातील शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी रुपयांचे हमीभावावर अन्नधान्य खरेदी केले. परंतु इतक्याच कालावधीत आमच्या सरकारने हमीभावाने साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. सन 2014च्या पूर्वी शेतकऱ्यांच्या मालाची 500 ते 600 कोटी रुपयांची हमीभाव केंद्रावर खरेदी व्हायची. आमच्या सरकारने 1 लाख 15 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. ते कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना त्यांच्या पैशांसाठी दलालांच्या भरवशावर राहायला लागायचे. महिनो-महिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते.
आमच्या सरकारने हमीभावचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायची योजना आणली. रब्बी पिकांसाठी हमीभावाची घोषणा केल्याने त्याचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन मागील 9 वर्षांत 70 हजार कोटींचे इथेनॉल खरेदी केले. ऊसउत्पादकांना वेळेवर पैसे मिळावे यासाठी कारखान्यांना मदत केली, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना आणली त्याचा आनंद आहे. इथल्या शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळतील, असे मोदी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या नावावर मतांचे राजकारण करणाऱ्यांनी पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तडफडत ठेवले. सन 1970मध्ये निळवंडे प्रकल्पाला मान्यता मिळाली. हा प्रकल्प पूर्ण होण्यास 5 दशके लागली. आमचे सरकार आल्यावर योजनेला गती मिळाली आणि आता लोकांना कालव्यातून पाणी मिळत आहे. बळिराजा सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. पाणी परमात्म्याचा प्रसाद आहे. एक थेंबही पाणी वाया घालवू नका, ही शेतकऱ्यांना विनंती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची बचत करा, असे आवाहन मोदी यांनी केले.
विकसित देशाचा संकल्प करू या!
महाराष्ट्रात अपार सामर्थ्य आहे. जितका जलद महाराष्ट्राचा विकास होईल तितकाच भारताचा विकास होईल. महाराष्ट्रात रेल्वे विस्ताराचा सिलसिला सातत्याने सुरू आहे. सन 2047मध्ये स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील, तेव्हा जगात भारताचे नाव विकसित देशांमध्ये होईल हा संकल्प करू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
VIDEO | PM Modi performs 'Jal Pujan' at Nilwande dam in Ahmednagar district of Maharashtra.
The project will benefit 182 villages from seven Tehsils (six in Ahmednagar district and one from Nashik district) by facilitating pipe distribution networks of water. The idea of… pic.twitter.com/IEVGc5m9y0
— Press Trust of India (@PTI_News) October 26, 2023