(मुंबई)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी राज्यामध्ये जिल्ह्या-जिल्ह्यांत महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्ष कामाला लागले असून, महायुतीच्या नेत्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यांत महायुतीचे मेळावे घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यातून महायुतीच्या स्थानिक नेत्यांत मनोमिलन हाच मुख्य उद्देश होता. तसेच भाजपसोबत शिंदे गट आणि अजित पवार गट सामील झाल्याने महायुती अधिक मजबूत झाल्याचा संदेश पोचविण्याचा प्रयत्नही केला गेला. सर्वच मेळाव्यांतून महायुतीच्या एकजुटीचा संदेशही दिला गेला. मात्र, या मेळाव्यातून महायुतीतील मनोमिलनापेक्षा मतभेदाचीच, नाराजीचीच चर्चा अधिक रंगली.
रायगड जिल्ह्यात तिन्ही पक्षांत नाराजीनाट्य दिसून आले. नगरमध्ये अजित पवार गटाचे नेते अनुपस्थित राहिले, तर नाशिकमध्ये छगन भुजबळांनी मेळाव्याकडे पाठ फिरविली. जळगावात थेट शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपला सुनावले. राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष अशी महायुतीचे सरकार आहे. आमदार, खासदार यांचे वरिष्ठ पातळीवर मनोमिलन झाले आहे. मात्र खालच्या पातळीवर आजही तीनही पक्षाच्या कार्यकर्ते यांच्यात मनोमिलन झालेले नाही असेच चित्र या मेळाव्यांमधूनदिसले.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे रविवारी महायुतीचा समन्वय मेळावा पार पडला. मेळाव्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख तीन नेत्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली. यावेळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना भाषण करण्यास संधी दिली नसल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शिवसेनेचे प्रतोद आ. भरत गोगावले यांनी सारवासारव करून आ. थोरवे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले आणि खासदार श्रीरंग बारणे यांना संधी देण्यात आली. तर भाजप तर्फे माजी आमदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील यांना संधी दिली. तर राष्ट्रावादी तर्फे खासदार सुनील तटकरे, महिला अध्यक्षा उमा मुंढे यांना बोलण्यास संधी दिली. व्यापिठवरील सर्व आमदार, खासदार यांना बोलण्याची संधी दिली असताना कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना डावलण्यात आले. त्यामुळे भर मेळाव्यात थोरवे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्याची समजूत काढण्याची भरत गोगावले यांनी प्रयत्न केले. मात्र त्याची नाराजी दूर झाली नाही.
नगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या पुढाकारातून मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप वगळता तीन आमदारांनी याकडे पाठ फिरविली. तसेच नाशिक येथील मेळाव्यात मंत्री छगन भुजबळही गैरहजर राहिले. तसेच जळगाव जिल्ह्यातील मेळाव्यात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट भाजप नेत्यांनाच सुनावले. त्यामुळ वाद चव्हाट्यावर आला.