(लांजा)
मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी येथे गॅस वाहतूक करणारा कंटेनर नदी कठडा तोडून खाली कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर गॅस टँकर मधून एलपीजी गॅसची गळती लागल्याने गुरुवारी सायंकाळी पासून मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आली होती.
दरम्यान महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने रांगेत असलेल्या वाहनचालकांची जेवणाची कोणतीही व्यवस्था होत नसल्याची माहीती काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लांजा येथील सामाजिक स्तरावर कार्यरत असणाऱ्या युथ वेल्फेअर संस्थेच्या निदर्शनास आल्यानंतर संस्थेने माहीतीची तात्काळ दखल घेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने बिस्किटे आणि पाणी बॉटल यांची व्यवस्था करून त्या ठिकाणी रांगेत उभे असलेल्या चालकांना नेऊन देत त्यांची तात्पुरती सोय केली.
एकंदरीत घटना घडल्यानंतर २४ तास वाहतूक ठप्प झाल्यानंतर कोणत्याही मार्गाने वाहनचालकांची जेवणाची व्यवस्था होत नसल्याची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी संपर्क करून किती वाहनचालक आहेत या संदर्भात माहिती घेऊन तेथे पोहोचून शुक्रवारी संध्याकाळी तेथे असलेल्या सर्व वाहनचालकांना बिस्कीटे व पाण्याचे वाटप करण्यात आले. एकंदरीत ही संस्था वाहनचालकांसाठी देवदूत ठरली.
युथ वेल्फेयर व मेमन समाज लांजा यांच्या सयुंक्त विद्यमानाने सहाय्याने हे सामाजिक कार्य पार पाडण्यात आले. यावेळी संस्थेचे अल्ताफ शेख, फारुख मोटलानी, इकबाल खतीब, रिजवान खतीब, याकुब पाटणकर आदी उपस्थित होते.