(पाली/वार्ताहर)
पाली विभागातून जाणाऱ्या मुंबई-गोवा व मिऱ्या-नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गांवर गेले काही दिवस मोठ्या प्रमाणावर बेदरकारपणे अवजड ट्रक वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांची वाढ झालेली आहे. यामुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या छोट्या वाहन चालकांना, दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.
महामार्गावरुन जाणारे हे अवजड ट्रक अत्यंत वेगाने, कोळसा व चिरा यांची वाहतुक करताना त्यावर ताडपत्रीचे आवरण टाकत नसल्याने धुळ वाऱ्याने उडते. परराज्यात जाताना या ट्रकांना दोन चालकांऐवजी एकच चालक असतो त्यामुळे तो वाहन चालवून थकतो व टप्पा लवकर गाठण्यासाठी काही वेळा तो जास्त वेगाने वाहन चालवतो. तर मागील हौद्याचे फाळका व त्याची साखळी बांधत नसल्याने ती आपटून अपघाताचा धोका असतो. शिवाय हे अवजड ट्रक कोळसा, चिरा मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वाहतुक करीत असतात. त्यामुळे या अवजड ट्रक चालकांविरुद्ध पोलीस नाक्याच्या समोरून ही वाहने जात असताना परीवहन विभाग किंवा आरटीओ कानाडोळा करून कारवाई करीत नसल्याचे चित्र अनेकवेळा दिसत आहे.