(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या चांगलेच रखडले आहे.त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत.गेले चार दिवस नातळ व थर्टी फर्स्टसाठी हजारो पर्यटक कोकणासाह परिसरात येत आहेत. यामुळे वर्दळ वाढल्याने अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. या महामार्गावर जर आता कोणाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या कार्यालयात आणू, असा स्पष्ट व निर्वाणीचा इशारा माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे.
बुधवारी त्यांनी महामार्ग खात्याचे अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेले काही महिने बंद आहे. बहादूरशेख येथील उड्डाण पूल पडल्यापासून कामाचे तीनतेरा वाजले आहेत. अधिकारी व ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांना बसत आहे. कळंबस्ते नाका येथे काय केलेत? तेथे सिग्नल हवा, गतिरोधक बसवायला हवा. येथील लोक गप्प आहेत या भ्रमात तुम्ही राहू नका, लोकांच्या जिवाशी खेळू नका. आपण प्रांत, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करणार आहोत असेही त्यांनी सांगून झोपी गेलेल्या प्रशासनाला व ठेकेदार कंपनीला जागे करणार असल्याचे श्री.मुकादम यांनी स्पष्ट केले.