(मुंबई)
सत्ताधाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह व मानहानीकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी महाप्रबोधन यात्रेमधील नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यानंतर ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेची सुरूवात झाली. ठाण्यातील टेंभी नाका येथून या यात्रेला सुरुवात झाल्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आक्रमक भाषणे केली होती. महाप्रबोधन यात्रेच्या शुभारंभ मेळाव्यात सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांनी भाषणे केली होती. या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक व चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे.
ठाण्यात शिंदे गट व भाजप नेत्यांवर आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी ठाकरे गटातील सुषमा अंधारे, विनायक राऊत, भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम १५३ आणि ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील टेंभीनाका येथे आयोजित या मेळ्यात मानहानीकारक भाषण केल्याचा ठपका ठेवत सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाप्रबोधन मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. तर भास्कर जाधव यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांची नक्कल केली होती. यातून बदनामी झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे बाळा गवस यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.