(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण हे शिवसेना चिन्ह देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडे दिला आहे. त्यानंतर मात्र ठाकरे गटाने धनुष्यबाणाच्या चिन्हाचे नामोनिशाण मिटवायला सुरुवात केली आहे. महापालिका मुख्यालयात २०१७च्या सदस्य संख्येनुसार महापालिकेने बहाल केलेल्या शिवसेना पक्षाच्या कार्यालयावरील धनुष्यबाण चिन्ह झाकण्यात आले आहे. या पक्ष कार्यालयावरील शिवसेना व वाघाचे चिन्ह हे कायम ठेवत धनुष्यबाण हे चिन्ह झाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
मुंबई महापालिका मुख्यालयातील शिवसेना पक्षाला दिलेल्या कार्यालयावर शिंदे गटाने ताबा सांगितल्यानंतर यावरून निर्माण होणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महापालिका प्रशासनाने शिवसेनेचे पक्ष कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या कार्यालयाबरोबरच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची पक्ष कार्यालयेही महापालिका प्रशासनाने बंद केली आहेत.
महापालिका मुख्यालयावर आजही ठाकरे गटाच्या आजी माजी नगरसेवकांचा वरचष्मा असून सोमवारी या महापालिका मुख्यालयातील या पक्ष कार्यालयातील शिवसेना नाव कायम ठेवून त्यावरील धनुष्यबाण हे चिन्ह झाकून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एकप्रकारे महापालिका मुख्यालयातील कार्यालयावर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांचाच प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षाला अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांची शिवसेने या कार्यालयावर दावा करत नसल्याचे चित्र आहे. उध्दव ठाकरे गटाकडे सर्वाधिक नगरसेवक असल्याने शिंदे गट प्रशासनाला याबाबतचे पत्र देत हे कार्यालय स्वतःसाठी खुले करून द्यावे अशी मागणी करताना दिसत नाही.