(पाचल / तुषार पाचलकर)
येत्या ४ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी पंचवार्षिक निवडणुकीसाठी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे श्री विशाल जगन्नाथ घोलप यांची महापरीवर्तन सहकार आघाडी पॅनलचा राजापूर तालुका सर्वसाधारण गटाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवड झाली आहे. श्री. विशाल घोलप हे सध्या उपशिक्षक या पदावर जि. प. प्राथ. शाळा येळवण नं.१, केंद्र- ओझर, ता.- राजापूर. या ठिकाणी कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ता. राजापूर चे पहिले तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे, याच बरोबर जुनी पेन्शन लढ्याच्या चळवळीच्या उभारणीत त्यांच्या मोलाचा वाटा आहे. सद्या ते महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हा सहसचिव म्हणून काम करत आहेत. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी तालुका, जिल्हा, राज्य तसेच देश पातळीवर झालेल्या सर्व आंदोलनामध्ये नेतृत्व केले आहे. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. अंशदान कपातीचा अचूक हिशोब वर्ग करणे, वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव मंजुरी, वैद्यकीय बिले, नियमित वेतनश्रेणी प्रस्ताव मंजुरी, तसेच शिक्षकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तत्परतेने उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखले जाते, हि सर्व कामे मार्गी लावत असतानाच आपल्या नम्र, विनयशील व सहकार्य वृत्तीमुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यातही श्री. घोलप यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली आहे. राजापूर तालुक्यात विविध क्षेत्रात काम करणारी समता प्रबोधन मंच-राजापूर या संघटनेचे सक्रीय सदस्य म्हणूनही ते सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
सहकाराची उत्तम जाण असणारा, सहकारातून समृद्धीकडे तत्व मानणारा व लोकशाही पद्धतीवर दृढ विश्वास असणारा, हुशार, अभ्यासू, उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून श्री. घोलप यांना ओळखले जाते. त्यांच्या याच प्रयत्नवादी, सहकार्यवृत्ती, विनयशील, सहकाराचा अभ्यास याचा योग्य सन्मान म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील तेरा संघटनांच्या महापरीवर्तन सहकार आघाडीतर्फे श्री. विशाल घोलप यांना राजापूर तालुका सर्वसाधारण उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे.
सद्यस्थितीत पतपेढी बांधकाम व जागा खरेदीतील अनियमितता, सभासदांना बसलेला TDS चा आर्थिक भुर्दंड, व्याजदर कमी न करणे, कर्ज मर्यादेत वाढ न करणे, शैक्षणिक कर्जाच्या व्याजात वाढ करून कर्ज मर्यादा कमी करणे, सभासदांनी दिलेला कौल मान्य न करता सत्ता मिळवणे, वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे न देता सभा गुंडाळणे, पतपेढीवर आपलीच मक्तेदारी रहावी यासाठी वाट्टेल त्या थराला जाणे इत्यादि अनेक बाबींवर सर्व सभासद नाखूष व नाराज आहेत. तसेच श्री. विशाल घोलप यांची वाढती लोकप्रियता व सर्व सभासदांमधून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता सद्यस्थितीत हि निवडणूक जिंकू असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या. रत्नागिरी या आपल्या कामधेनुरूपी संस्थेचा सहकार क्षेत्राला आदर्श वाटेल असा विकास करण्यासाठी व सभासदाभिमुख पारदर्शक कारभार करण्यासाठी श्री. विशाल घोलप यांना राजापूर तालुका उमेदवार म्हणून तसेच महापरीवर्तन सहकार आघाडी पॅनेलच्या जिल्हा राखीव ७ उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राजापूर तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद जाधव यांनी आवाहन केले.