(रायगड / चंद्रकांत कोकणे)
महाड शहरात असलेल्या प्रभात कॉलनी या मध्यवर्ती ठिकाणचे रहिवासी असणारे प्रसिद्ध व्यापारी सुभाष धनजी शेठ यांच्या घरामध्ये शनिवारी पहाटे धाडसी घरपोडी झाल्याची घटना घडली असून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला केला असून या घटनेमुळे महाड शहर पूर्णपणे हादरले आहे. चोरीचा तपास लावण्यासाठी श्रानपथकाची मदत घेतली जाणार आहे.
महाड मधील प्रभात कॉलनी येथील डॉ.दाभाडकर हॉस्पिटलच्या समोरील बाजूस असणाऱ्या “साई पॅलेस” या इमारतीतील फ्लॅट क्रमांक ३ मध्ये सुभाष शेठ त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि दोन नातवंडे असा परिवार राहतो. त्यांचा मुलगा सेऊल हा त्याच्या परिवारासह दोन दिवस देवदर्शनासाठी बाहेरगावी गेला असताना शनिवारी पहाटेच्या सुमारास तो घरी परत आला त्यावेळी घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. सुभाष शेठ आपल्या पत्नीसह चांभारखिंड येथील दुसऱ्या निवासस्थानी वास्तव्यास होते. सदर चोरी झालेल्या ठिकाणी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला व सर्व सोन्याचांदीचा किमती ऐवज तसेच रोख रकम असा पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार एकूण 9 लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला असल्याची माहिती समोर येत आहे परंतु संपूर्ण घटनेच्या तपासाअंती हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्या कारणाने चोरट्यांची प्राथमिक ओळख मिळू शकलेली नाही. शहरातील अन्य भागातील मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज द्वारे माहिती मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू असून या चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता महाड शहर पोलिसांपुढे उभे ठाकलेले आहे. घटनेनंतर महाडचे डी वाय एस पी शंकर काळे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन घटनेचा संपूर्ण आढावा घेत काही वेळातच श्वान पथकाला पाचारण केले. या घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये नुकतेच नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या अशा धाडसी चोरीमुळे महाडमधील नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.