(महाड / चंद्रकांत कोकणे)
रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये नागरिक भीषण पाणी टंचाईला सामोरे जात असताना महाडचे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव यांनी मोफत पाणी वाटपाचा उपक्रम सुरू केला असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावर स्वागत केले जात आहे. कोणताही राजकीय हेतू समोर न ठेवता एक सामाजिक बांधिलकी या भावनेतून जाधव यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
मार्च एप्रिल पासून महाड शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्या नंतर नगरपालिका प्रशासनाकडून पाणी वाटपाचे नियोजन केले जात आहे. यावर्षी पाऊस लांबल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे व कुर्ला येथील धरणाची पातळी पूर्णपणे खालावली आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला असल्याचे संदीप जाधव यांनी सांगितले.
नगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याचे वितरण शहराच्या विविध भागांमध्ये करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना थोडाफार दिलासा मिळत असला तरी सध्याची पाणी वाटपाची यंत्रणा अपुरी पडत आहे. अनेक भागांमध्ये पालिका प्रशासनाची पाणी वाटप यंत्रणा पोहोचू शकत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता संदीप जाधव यांनी मोफत पाणी वाटप उपक्रम सुरू केला असल्याने असंख्य नागरिकांना टंचाई काळामध्ये पिण्याचे पाणी मिळत आहे. अत्यंत कठीण आणि आणीबाणीच्या परिस्थितीतून महाडकर नागरिक जात असताना संदीप जाधव यांनी पुढे केलेल्या मदतीचे शहरातून स्वागत केले जात आहे.