(संगलट- खेड/विशेष प्रतिनिधी)
दापोली तालुक्यातील अडखल खाडीमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन होत असल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच महसूल खात्याला चांगलीच जाग येऊन येथे धडक कारवाई करण्यात आली आहे. रविवारी महसूल खात्याच्या पथकाने अडखल खाडीमध्ये दोन सक्शन वाळूने भरलेल्या बोटी आणि 6 ब्रास वाळू असे सुमारे वीस ते बावीस लाखाचा मुद्देमाल जप्त करून वाळूच्या बोटी जेसीबीच्या मदतीने तोडफोड करून समुद्रात बुडवण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे.
प्रथमच एवढी मोठी कारवाई झाली असल्याचे अडखळ खाडी परिसरात बोलले जात आहे. सदरच्या खाडीमध्ये सुमारे सहा ते सात सेक्शन पंप लावले जात असल्याची चर्चा होती, आणि या पंपाच्या माध्यमातून काही वाळू सम्राटानी आपली टोळी उभी करून अवैध वाळू उत्खनन केले जात होते. सदरची बाब ही गेल्या काही महिन्यापासून सुरू होती. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडत असल्याची चर्चा होत होती. अनेक ठिकाणी असे वाळू सम्राट लोकांना सांगत असतात की, आम्ही वाळू उत्खनन करण्यासाठी रॉयल्टी घेतली आहे. मात्र प्रत्यक्ष शासनाकडून सक्शन पंप लावण्यासाठी अद्याप कोणतेही आदेश नसल्याने हा प्रकार होण्यामागे कोणाचे आशीर्वाद असतात आणि ह्या खाडीमध्ये सक्शन पंप लावण्यासाठी कोणी आदेश दिले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदर वाळूचोरी होत असल्याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यानी महसूल खात्याकडे तक्रारी केल्या होत्या. अनेक महिन्यापासून महसूल खाते या तक्रारीची दखल घेत नव्हते. मात्र काल रविवारची अचानक ही कारवाई करत इतर वाळू चोरानाही इशारा दिला आहे.
संध्याकाळी सहा ते पहाटे 6 वाजेपर्यंत येथून नियमित वाळू उत्खनन करण्यात येत होते. सदरच्या वाळू उत्खनन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बोट व अत्याधुनिक यंत्र सामुग्री यांचा वापर केला जात होता. वापर करण्यात येत असलेल्या बोटीला शासनाचा VRC नंबर देखील नव्हता. याचाच अर्थ कोणाचीही भीती न बाळगता अतिरेकी सारखा व्यवसाय येथे सुरू असल्याचे बोलले जात आहे. आता सदर वाळू सम्राट यांच्यावर गुन्हा दाखल कधी होणार असा प्रश्नही जनतेतून विचारला जात आहे.
सदरची एवढी मोठी कारवाई दापोली तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्री शरद पवार, तहसीलदार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळकर तसेच पथक प्रमुख सुदर्शन खानविलकर हर्णे तलाठी अमित शिगवण, ताडील मिराशे, अडखल पोलीस पाटील शिर्के, अडखल सरपंच रवींद्र घाग यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सदरच्या कारवाईमुळे अडखल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.