राज ठाकरेंनी पुन्हा भोंग्यांचा विषय काढू नये. राज ठाकरे गर्दी जमवण्यात निपुण आहेत. त्या माध्यमातून त्यांनी आपला पक्ष वाढवावा. आपले उमेदवार निवडणूक आणण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे लावायला काय हरकत नाही. त्यांनी मुस्लिमांच्या भोंग्याला विरोध करू नये, असा सल्ला सांगलीत पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना दिला आहे. मशिदीवरील भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील, याचा विचार राज ठाकरे यांनी करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे आता मशिदीवरील भोंग्याला विरोध करत आहेत. पण सुरुवातीला त्यांनी आपल्या झेंड्यात हिरवा, निळा आणि भगवा रंग लावला होता. आता त्यांनी भोंग्यांच्या विरोधात बोलणं योग्य नाही.
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले, राज ठाकरे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांनी मुंबईतील विद्युत रोषणाईला डान्सबार म्हणणं योग्य नाही. मुंबईला सुंदर करण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करत आहे. त्याला डान्सबार बोलणं योग्य नाही. आगामी निवडणुकीत शिवसेना व भाजपसोबत रिपाइं असल्याने राज ठाकरेंची महायुतीत गरज नाही. आमच्या युतीत राज ठाकरेंना घेऊन चालणार नाही. यामुळे भाजपाची राष्ट्रीय पातळीवर अडचण होण्याची शक्यता आहे, असे मनसेला महायुतीत घेण्याबाबतचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.