(मुंबई)
शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड एकनाथ शिंदे यांनी केले. यानंतर मूळ शिवसेनेची संपूर्ण घडी विस्कटली गेली. एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक आमदार-खासदार आमच्या बाजूने असल्याचे सांगून शिवसेना पक्षावर व पक्षचिन्ह धनुष्यबाणावर दावा सांगितला. याबाबत उद्धव ठाकरे आणि आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयामार्गे निवडणूक आयोगात पोहोचला. त्यानंतर दोन्ही गटांनी सादर केलेल्या पुराव्यानंतर महत्वपूर्ण निर्णय देत निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. तसंच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यानंतर आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावे दिली आहेत. तसेच ठाकरे गटाला निवडणुकीसाठी नवीन चिन्ह ‘धगधगती मशाल’ असे दिले.
३ नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या चिन्ह्याचा निर्णय होणे गरजेचे होते. मात्र याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याने या पोटनिवडणुकी पुरते पक्षाचे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवण्यात आले. आता ठाकरे गट ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ या नावाने तर शिंदे गट ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावाने निवडणूक लढवू शकणार आहे. त्यासोबतच ठाकरे गटाला नवे चिन्ह म्हणून ‘धगधगती मशाल’ देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या आधीही शिवसेनेने मशाल या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे. १९८५ साली माझंगाव विधानसभा मतदार संघातून छगन भुजबळ हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते आणि तेव्हा ‘मशाल’ या चिन्हावरच ते पहिल्यांदा आमदार झाले होते. १९८९ मध्ये सेनेला धनुष्यबाण हे कायमस्वरुपी निवडणूक चिन्ह मिळाले. त्यापूर्वी शिवसेनेच्या उमेदवाराची नोंद अपक्ष उमेदवार म्हणून होत होती. १९८५ साली छगन भुजबळ हे माझगाव विधानसभा मतदारसंघातून मशाल चिन्हावर विधानसभेत गेले होते. तर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सेनेचा पहिला खासदारसुद्धा मशाल याच चिन्हावर निवडून आला होता, अशी माहिती शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली.