(छ. संभाजीनगर)
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात विजय मिळवल्यानंतर मविआनं संभाजीनगरमध्ये एकीचं दर्शन देत भाजप-शिंदे गटाविरोधात रणशिंग फुकलं आहे. महाविकास आघाडीची संभाजीनगरमधील ही पहिलीच वज्रमुठ सभा होती. यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी मविआकडून सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता विरोधकांची वज्रमुठ तर सत्ताधाऱ्यांची सावरकर गौरव यात्रेमुळं आगामी काळातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिन्ही पक्षांनी मिळून ही सभा आयोजित केल्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसनचे अनेक नेते, उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटाचे नेते आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. मात्र महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच पुढं जाणार हे आजच्या सभेतून स्पष्ट झालं आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र या सभेसाठी उद्धव ठाकरे उशीरा आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रमुख नेते आधीच हजर होते. अर्थातच उद्धव ठाकरे यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सभास्थळी प्रतीक्षा करावी लागली. सभेत सर्व नेत्यांनी अगदी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आपलं भाषण आवरत घेतल्याचं पाहायला मिळालं. या सभेत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या दोघांनी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि अजित पवार या दोघांनी भाषणं केली. तर अखेरचं मुख्य भाषण उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यामुळे महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातच पुढं जाणार, हे स्पष्ट झालं.
सभास्थळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी विशेष आसन लावण्यात आलं होतं. तर इतर सर्व नेत्यांना साध्या खुर्च्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सभेत वेगळं स्थान होतं, हे दिसून झालं. या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांचं भाषण सर्वाधिक वेळ चाललं. उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर थेट हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केवळ केंद्र सरकारवर हल्ला चढवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेल्यामुळे शिंदे गटावर हल्ला चढवला. शिवाय उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचं कौतुकच केलं. त्यामुळे एकंदरीतच उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा राहणार हे अधोरेखित झालं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी महाविकास आघाडीच्या या पहिल्या जाहीर सभेत भाजप आणि सध्याच्या शिवसेनेवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बाप चोरी केला, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
देशातील लोकशाही धोक्यात असल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच महाविकास आघाडीची वज्रमूठ आता अशीच अबाधित राहील, असं देखील ठाकरेंनी म्हटलं. या सभेत त्यांनी आपल्या प्रत्येक वाक्यातून भाजपवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –
संभाजीनगर नामांतर :
हेच ते मैदान आहे आणि हेच ते शहर आहे, १९८८ वर्षी संभाजीनगरची महापालिका शिवसेनेच्या हातात दिली. येथेच याच मैदानात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या शहराचं नाव आजपासून संभाजीनगर करतोय, असं जाहीर पणे म्हटलं होतं. यानंतर जे काही घडलं ते आपण पाहिलं. मात्र महाविकास आघाडीच्या काळात आपण संभाजीनगर असं नामांतर करू शकलो, याचा अभिमान आहे.
सावरकर गौरव यात्रा :
सावरकर गौरव यात्रेचा उल्लेख ठाकरेंनी केला. यात्रा जरूर काढा. ते हिंदू जनआक्रोश पण सुरू झालाय. मुंबईत मोर्चा काढला होता यांनी. शिवसेना भवनपर्यंत हा मोर्चा आला. याचा अर्थ असा होतो, विश्वातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाला असेल, आणि त्यानंतर हिंदूंना आक्रोश करावा लागत असेल तर, लाज वाटायला पाहिजे.
हिंदुत्व सोडल्याच्या आरोप :
माझ्यावरती हिंदुत्वाच्या आरोप करत आहेत. पण मी तुम्हाला विचारतो की, मी हिंदुत्व सोडलं का? आम्ही जर काँग्रेससोबत गेलो म्हणून मी हिंदुत्व सोडतो असं म्हणत असाल, तर तेव्हा मेहबूबा मुफ्तीसोबत काश्मीरमध्ये सरकार स्थानन केलं तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही का?
नरेंद्र मोदींच्या पदवीवर टीका :
महाराष्ट्रात लाखो युवक आहेत. त्यांनी कर्ज काढून पदव्या मिळवल्या. अलीकडच्या काळात डॉक्टरेटही विकत घेता येते. काही जण पाण्याचं इंजे्क्शन घेऊन फिरतात. अनेकांच्या पदव्यांना किंमत नाही. मात्र कोणी पंतप्रधान मोदींची पदवी दाखवा म्हंटलं तर २५ हजारांचा दंड बसतो. पंतप्रधान मोदी ज्या कॉलेजमध्ये शिकले त्यांना अभिमान का वाटू नये. त्यांची पदवी मागितली तर दाखवणार नाहीत, या पदवीचा उपयोग काय? दंड भरण्यासाठी त्याचा उपयोग होतो का?
अमित शहांवर वार :
अमित शाह मध्यंतरी म्हणाले, शिवसेनेला जमीन दाखवायची आहे. आम्हाला काय़ जमीन दाखवताय, जमीन दाखवायची असेल तर पाकव्याप्त जमीन घेऊन दाखवा. सरदार वल्लभाई पटेलांचा मोठा पुतळा उभा केला आहे. वल्लभभाई नसतेच तर आज मराठवाडा मु्क्ती झाली असती का? धाडस दाखवून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य का घुसवत नाही? घुसवा की फौजा.
बाळासाहेबांचं नाव सोडणार नाही :
आज माझ्या हातात काहीच नाही. ज्यावेळेला भाजपला काडीची किंमत नव्हती, तेव्हा भाजपला बाळासाहेब ठाकरेंनी साथ दिली. आज भाजपसोबतजुने सहकारी नाहीत. शिवसेना नाही, अकाली दल नाही. गरज होती तेव्हा वापरून घेतलं. आता लाथा मारत आहेत. आज त्यांनी आपल्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चोरलं. इतकंच नाही तर माझे वडीलांना चोरण्याचा प्रयत्न त्यांनी चालावलाय. पण मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. मी भाजपल इथे आव्हान देतो. असेल हिंमत तर मोदींनी इथे यावं आणि त्यांच्याच चेहरा वापरून, त्यांच्या नावाने मतं मागावी.