(मुंबई)
चर्चगेट येथील एमसीए लाऊंज येथे काल रात्री महाविकास आघाडीच्या विधीमंडळ सदस्यांची संयुक्त बैठक पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही बैठक बोलावली होती. यावेळी महाविकास आघाडी एकत्र लढणार, पुन्हा वज्रमूठ सभा होणार, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आज पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमधील नेते या बैठकीला उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचा निर्धार मविआ नेत्यांनी बैठकीत केला. बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्ही तिन्ही मित्र पक्ष एकत्र आहोत. एकत्र लढणार आहोत. लोक आमच्याबरोबर आहेत. आम्ही विभागवार बैठका घेणार आहोत. तसेच लवकरच वज्रमूठ सभादेखील सुरू होणार आहेत. सभा पाऊस थांबल्यानंतर सुरू होतील. विरोधी पक्ष म्हणून आम्ही समर्थपणे लढत आहोत. सरकारकडून आमच्या अपेक्षा आहेत. मात्र, अभिप्रेत उत्तर सरकार टाळत आहे, असे थोरात म्हणाले.
सरकारकडून भिडेंना पाठिशी घालण्याचे काम
संभाजी भिडे यांचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांचे वक्तव्य सांगण्याचीसुद्धा लाज वाटते. मात्र, सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. देवेंद्र फडणवीस त्यांना गुरुजी म्हणतात. पण ते काय बोलतात, कसे वागतात ते बघा. फडणवीसांनीदेखील त्यांना गुरूजी म्हणताना विचार केला पाहिजे, असे थोरात म्हणाले.