काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांना पंतप्रधान पदाचा चेहरा बनवावे, असा प्रस्ताव आला होता. मात्र, स्वत: खडगे यांनीच तो नाकारला आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीकडून कोणत्या चेहऱ्याला पुढे केले जाते का? याबाबत उत्सुकता आहे. उल्लेखनीय असे की, राहुल गांधी हे आघाडीकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून स्पर्धेत नसल्याचे सांगितले जात आहे.
विरोधी पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची एक महत्त्वाची बैठक मंगळावर (19 डिसेंबर) दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. खास करुन पंतप्रधान पदाचा चेहरा. प्राप्त माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांना पंतप्रधान पदाचा चेहरा बनवावे, असा प्रस्ताव आला होता.
इंडिया आघाडी पक्षांच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून खर्गे यांचे नाव सूचवले. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारत ब्लॉकच्या बैठकीतील प्रस्तावांना उत्तर देताना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास स्पष्टपणे नकार दिला. स्वत: खडगे यांनी नमूद केले की, आम्ही लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करु. त्यानंतर पंतप्रधान पदाचा चेहरा सर्वानुमते निवडू.
ते म्हणाले, प्रथम आपणा सर्वांना जिंकायचे आहे. विजयासाठी काय करावे लागेल याचा विचार केला पाहिजे. पंतप्रधान कोण होणार, हे नंतर ठरवले जाईल. जर कमी खासदार असतील तर आताच पंतप्रधानांबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे. प्रथम, आमची संख्या वाढवण्यासाठी एकत्र येऊन, आम्ही बहुमत आणण्याचा प्रयत्न करू.