रत्नागिरी : मी स्वामी स्वरूपानंदांना भेटू शकले नाही, पण त्यांचे राष्ट्रभक्तीचे विचार वडिलांकडून माझ्याकडे आले. त्यांच्या नावाची स्पर्धा होणे हे औचित्य आहे आणि या महाविद्यालयाचे हे भाग्य आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना स्वामींची अध्यात्मिक परंपरा, विचारांना मोकळेपणा स्वातंत्र्य मिळते. विषयाची मांडणी, तयारी होते, मराठी भाषा समृद्ध आहे. मान, प्रतिष्ठा गौरव वाढवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. तेव्हा आपले वक्तृत्व समृद्ध होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांनी बुधवारी सायंकाळी केले.
पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पुरस्कृत आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय आयोजित आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होत्या. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाला सेवा मंडळाचे कार्यवाह हृषिकेश पटवर्धन, ज्येष्ठ सदस्य हेमंत गोडबोले, अमर देसाई, प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य विशाखा सकपाळ उपस्थित होत्या. परीक्षक म्हणून सौ. सुनेत्रा जोशी, डॉ. वैशाली वाढे, स्वामीराज भिसे, श्रीनिवास जरंडीकर यांनी काम पाहिले. यावेळी परीक्षक सौ. सुनेत्रा जोशी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी भाषणातच नव्हे तर काही चांगले गुण आचरणातही आणावेत. श्री. गोडबोले यांनी नवी पिढी घडवण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून त्या अनुषंगाने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. तसेच ऑनलाइन स्पर्धा घेण्याचे कठीण काम महाविद्यालयाने नियोजनबद्धपणे पार पाडले, याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे, असे सांगितले.
डॉ. साखळकर यांनी महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेची माहिती देऊन स्वरूपानंद सेवा मंडळामुळे ही आंतरराज्य स्पर्धा घेण्याचे भाग्य गेली १९ वर्षे महाविद्यालयास मिळाल्याचे सांगितले.
सेवा मंडळातर्फे प्राचार्य डॉ. साखळकर यांच्यासह स्पर्धाप्रमुख प्रा. मानसी गानू, प्रा. अभिजित भिडे, प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. चेतन मालशे, प्रा. तेजश्री भावे, आणि प्रा. मकरंद दामले यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रास्ताविक प्रा. मानसी गानू यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तेजश्री भावे यांनी केले. प्रा. निनाद तेंडुलकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा
प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ या क्रमाने कंसामध्ये कॉलेजचे नाव
कनिष्ठ गट- नेहा प्रभूतेंडोलकर (कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज), प्रणिता भोसले (डॉ. दादासाहेब सामंत ज्युनिअर कॉलेज, पावस), शिवम जाधव (आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालय, देवरुख), सानिका कुंटे (कुडाळ हायस्कूल, कुडाळ), चैतन्या तेंडोलकर (आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालय, देवरुख. सांघिक विजेता- कुडाळ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कुडाळ, सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक- प्रा. गोविंद पवार, कुडाळ हायस्कूल. या गटासाठी जन्मासंगे मृत्यू, वंदावी ती पाऊले, संतांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान हे विषय होते. विजेत्यांना प्रथम ३ हजार, द्वितीय २ हजार, तृतीय १५०० आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी ७५० रुपयांचे पारितोषिक दिले.
वरिष्ठ गट- संतोष शिंदे (क्रिस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, पुणे), ईर्षा सोवनी (सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे), रेणुका धुमाळ (कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे), रिया पटवर्धन (गोयंका कॉलेज ऑफ मिडीया स्टडीज, मुंबई), सिमरन शेख (वंजारे महाविद्यालय, लांजा). सांघिक विजेता- सर परशुरामभाऊ कॉलेज, सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक प्रा. मनोजकुमार देवणे, सर परशुरामभाऊ कॉलेज. या गटासाठी बुद्धिमंत काय बोलती ते वाया, जना सौख्य द्याया यंत्रयुग, जागतिक राजकारण आणि बदलता भारत, निसर्गासारखा नाही रे सोयरा हे विषय दिले होते. प्रथम क्रमांकास ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी १ हजार रुपयांचे पारितोषिक दिले.