(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील मराठा सेवा संघातर्फे शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा, अश्वारूढ शिवछत्रपती महाराजांच्या मूर्तीची पालखी, शिवरायांची वेशभूषा, मावळे, साहसी खेळ, लेझीम कथाकथन, अभिवाचन, बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी शिवजयंतीचा भरगच्च कार्यक्रम उत्साह संपन्न झाला.
सदरचा कार्यक्रम मराठा सेवा संघाचे धडाडीचे आणि अभ्यासू अध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवरायांची मूर्ती देणगी रूपाने दिलेले देणगीदार विजय देसाई(विल्ये) यांचा तसेच शिवछत्रपती महाराजांची हुबेहूब वेशभूषा साकारलेले शिवप्रेमी रामकृष्ण सोरे यांचा मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
शिवजयंतीनिमित्त मराठा सेवा संघातर्फे जाकादेवी सुधाश्री हॉटेलपासून ते गारवा हॉटेल जाकादेवीपर्यंत भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवराय यांच्या वेशभूषेसह साकारलेली शिवशाहीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधले. परिसरातील चवे गावातील धाडसी विद्यार्थ्यांनी साहसी खेळाचे प्रदर्शन केले. अंगणवाडी ते प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांनी अतिशय समर्पक कथाकथन करून छत्रपती शिवराय माता जिजाऊ यांच्या कार्याचा उचित गौरव केला. यावेळी विविध स्तरातील आलेल्या मान्यवरांचा मराठा सेवा संघातर्फे पुष्पगुच्छ व शिवाजी महाराज यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
मराठा सेवा संघ आयोजित या कार्यक्रमात प्रामुख्याने विजय देसाई, अमर देसाई, प्रकाश खोल्ये, प्रतिक देसाई, संजय थोरात, चित्रकार अर्जुन माचिवले, महादेव माचिवले, स्वप्निल देसाई, मयुरेश देसाई, प्रसाद देसाई, वृत्तसंकलक संतोष पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिवाचन फुणगुस हायस्कूलचे शिक्षक श्री.भागवत यांनी अतिशय समर्पक पद्धतीने करून अनेक प्रसंग उभे केले. हा कार्यक्रम गारवा हॉटेलच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. या कामी गारवा हॉटेलचे मालक मंगेश चव्हाण, बाबुशेठ पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. साकारलेली शिवशाही, लाठी काठी प्रात्यक्षिक, लेझीम, अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची पालखी यांमुळे शिवजयंतीला उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावेळी मराठा समाजातील नैपुण्य संपादन केलेल्या गुणवंतांचा प्रेरणादायी सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते संभाजी गणेशकर, अरूण जाधव, सुनिल पाटील, हनुमंत कदम, सचिन देसाई, अशोक दाताळ, विक्रम पाटील, बालाजी टेकाळे, सुरेश रणदिवे, संजय थोरात यांसह मराठा सेवा संघाचे सर्व सभासद यांनी खूपच मेहनत घेतली. स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या जयंती उत्सवात पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.