(नागपूर)
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना देखील जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षण मागण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर तेथील पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अमानुष लाठी चार्ज केला गेला. याविरोधात अखिल भारतीय मराठा महासंघ नागपूरतर्फे आज सकाळी निषेध आंदोलन केले जाणार असून मराठा महासंघाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
५४ पेक्षा जास्त लाखोंचे मोर्चे मराठा समाजाने शांततेत काढून जगभरात नाव केले . पण या लाठीचार्जमुळें शांततेत होत असलेल्या आंदोलनाला कुठेतरी चिघळण्याचे प्रयत्न केल्या गेले. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागले आहे. ठिकठिकाणी उद्या दि. २ सप्टेंबर रोजी मराठा समाजाने तातडीची बैठक बोलवली आहे. आणि मराठा महासंघातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येणार असून या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठा महासंघ नागपूरतर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. दोषींवर त्वरित कार्यवाही झाली नाही तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलने करण्यात येईल. असा इशारा राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप धंद्रे विदर्भ पूर्व अध्यक्ष शशिकांत होणे, नागपूर महानगर अध्यक्ष तेजसिंग मोरे यांनी दिला आहे.