(मुंबई)
सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. त्यामुळे या प्रकरणी कुणीही संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे इशारावजा आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरून रान पेटवले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी हे विधान केले आहे. जम्मू कश्मीरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
मराठा आरक्षणावरून महायुतीतच महाभारत सुरू आहे. आरक्षणावरून भुजबळांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनंतर, वादग्रस्त वक्तव्यानंतर आता महायुतीतील नेत्यांमध्ये वादावादी सुरु झाली आहे. यावरुन शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांनीही आपले मत व्यक्त केले असून भुजबळ यांचे कालचे विधान आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार आहे.
ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार आहे. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही.
आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न – जरांगे
मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही असे दोन ते तिन जणांनी ठरवले आहे. त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात षडयंत्रण रचले जात असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
भुजबळांच्या नातेवाईकांचे हॉटेल त्यांच्याच जवळच्याच कुणीतरी फोडले असल्याचा आरोप देखील जरांगे पाटील यांनी केली. मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी ओबीसी नेते प्रयत्न करत असल्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल होत आहे. त्यामुळे मराठा नेत्यांनी पुढे यावे, तुम्ही आमच्यामुळेच नेते झाले आहात, हे लक्ष्यात ठेवा, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजातील नेते आता जर समाजासाठी पुढे आले नाही, तर त्यांचे काय करायचे, हे मराठा समाज ठरवणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.