(बीड)
बीड येथे पती-पत्नीने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे ही घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हे दाम्पत्य मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसले होते. त्यानंतर अचानक उठून घरी आले व गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील जातेगाव येथे सुरु असलेल्या उपोषणात सहभागी पती-पत्नी अचानक घरी गेले. यानंतर त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे उघडकीस आली.
राजु बंडू चव्हाण (वय ३१) आणि सोनाली राजु चव्हाण (वय २८) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. जातेगाव येथे मराठा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात राजु चव्हाण सहभागी झाले होते. अचानक उपोषणातून उठले जवळच असलेल्या घरी जावून पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून दामपत्याने आत्महत्या का केली, हे अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी तलवाडा पोलीस अधिक तपास करत आहे
काही दिवसापूर्वी जालन्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आंदोलनाचे लोण संपूर्ण राज्यभर पसरले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशीवमध्ये एका तरुणाने तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. तर अनेक तरुणांनी आपल्या गाड्य पेटवल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच आता बीडमध्येही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जातेगाव येथे सुरू असलेल्या उपोषणात सहभागी दाम्पत्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतरवाली गावात गेल्या जवळपास १४ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन स्थळावरून घरी परतणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी जाहीर केली आहे.
पती- पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसून याप्रकरणी तलवाडा पोलीस अधिक तपास करत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अधिक तापणार अशी चिन्हे आहेत.