कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी (५ डिसेंबर) नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये २९ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमात ‘भाईजान’ सलमान खान प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. सलमाननं दीपप्रज्वलन करून चित्रपट महोत्सवाची सुरुवात केली.
या सोहळ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कलाकारांसोबत स्टेजवर नृत्य केलं. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये सलमान खान आणि इतर कलाकार स्टेजवर उभे असलेले बघायला मिळत आहेत. त्यानंतर व्हिडीओमध्ये सलमान हा ममता बॅनर्जी यांना नृत्य करण्याची विनंती करतो. सुरुवातीला ममता बॅनर्जी नकार देतात, पण नंतर महेश भट्ट आणि इतर कलाकारांनी विनंती केल्यानंतर त्या गाण्यावर ठेका धरतात. ममता बॅनर्जी यांनी रवींद्रनाथ टागोर यांचे बांग्लार माती, बांग्लार जोल हे गाणे देखील गायले.
#SalmanKhan dances with Bengal CM Mamata Banerjee and Mahesh Bhatt at Kolkata International Film Festival pic.twitter.com/fN2PKE22wM
— Surajit (@surajit_ghosh2) December 5, 2023
यावेळी टॉलिवूड अभिनेता देव यांनी सलमानला स्मृतिचिन्ह प्रदान केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डोना गांगुली यांच्या पथकानं एका गाण्यावर नृत्य करून पाहुणे आणि दिग्गज कलाकारांचं स्वागत केले. विशेष म्हणजे, त्या गाण्याचे बोल आणि संगीत स्वत: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लिहिले आहेत.
सिनेप्रेमी दरवर्षी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची वाट पाहत असतात. या चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला सलमान खान, महेश भट्ट, अनिल कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांसारखे स्टार्स उपस्थित होते. क्रिकेटर सौरभ गांगुलीनं देखील या सोहळ्याला हजेरी लावली.