(संगमेश्वर)
गेली अनेक वर्षे सामाजिक, क्रीडा शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करीत असलेले देवरुख गावाचे मनोहर गुरव यांच्या सामाजिक कार्याचा विचार करून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबई यांनी संगमेश्वर तालुका प्रचार संयोजक म्हणून निवड केली आहे. मनोहर गुरव यांनी समाजकार्यात मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट काम केले असून टेनिस व लेदर बॉल क्रिकेटपटू म्हणून महाराष्ट्र राज्यात लौकिक मिळविलेले आहे. तसेच संगमेश्वर तालुक्यामध्ये गुणवंत खेळाडूना लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे, त्यांना जिल्हा, राज्य संघात स्थान प्राप्त व्हावे यासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये संगमेश्वर तालुका क्रिकेट असोसिएशन स्थापन करून शासन नोंदणीकृत केली. तसेच मयुर स्पोर्ट्स अकॅडमी देवरुख चे वतीने मुंबई, रत्नागिरी जिल्ह्यातून नामवंत प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येते.
मनोहर गुरव यांनी आजवर अनेक गुणवंत खेळाडूं निर्माण केले. तालुक्यातील खेळाडू मुंबई, कोल्हापूर मध्ये आपले खेळाचा ठसा उमटवित आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत असून अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले असून श्री बिपिन बंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज क्रिकेट क्लब रत्नागिरी व इलेव्हन फायटर रत्नागिरी या संघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. टेनिस व लेदर बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा गाजविल्या असून उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अनेक बक्षिसे मिळविली आहेत. सध्या महाराष्ट्र समविचारी मंच रत्नागिरीचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत. तसेच मयुर स्पोर्ट्स अकॅडमी व तालुका असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे मानवाधिकार हक्क संरक्षण असोसिएशनचे कार्याध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.
हल्ली विविध विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तसेच शासनाच्या दिलेल्या मार्गदर्शिकेनुसार कामे होत नसल्याने त्या बाबत तक्रारी येत असून अनेक नागरिकांनी विविध विभागाला पत्र व्यवहार केले असून त्याचे साधी उत्तरे न देता कचऱ्याच्या कुंडीत टाकण्याचे प्रकार जास्त आहेत. प्रामुख्याने रस्ते, गटारे, अनधिकृत बांधकामे,सांड- पाण्याचा प्रश्न, गार्डन, डंपिंग ग्राउंड, स्मशानभूमी, प्रवाशी शेड, 14 व 15 व्या वित्त आयोग मधील कामे अशा अनेक योजनांवर लाखो खर्च करण्यात आले असून त्या पद्धतीने कामे झाली नसल्याचे नागरिकांचे तसेच स्थानिक रहिवाश्यांचे म्हणणे आहे. विविध विभाग, सोसायट्याकडून सनदशील मार्गाने खर्चाचा तपशील, बिले, लेखापरीक्षण अहवाल, अशी जनहितार्थ करीता माहिती मागविण्यात येणार आहे. जनतेने, युवकांनी आपल्या हक्का साठी जागृत व्हावे. तसेच गावा गावात माहितीचा अधिकार कार्यकर्ता निर्माण करण्याकरिता महासंघाचे मार्गदर्शनाखाली संगमेश्वर तालुक्यात गावागावां मध्ये कमिटी स्थापन करण्याचा मानस आहे, असे त्यांनी म्हटले आहे.