( साईशा / जैतापूर )
आज बुधवारी सकाळी जीवाचा थरकाप उडवणारी घटना राजापुरातील जैतापूर येथे घडली. मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीने सकाळी 10.30 जैतापूर खाडी पुलावरून अचानक थेट समुद्रात उडी घेतली.
दरम्यान याच जैतापूर पोलिस पाटील राज प्रसाद राऊत आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन पुलावरून जात होते. त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड करून धाऊलवल्ली बाजूकडील होडीवाल्यांना बोलावले. त्यावेळी त्या ठिकाणी असलेले शशिकांत कोठारकर आणि संतोष दळवी यांनी तात्काळ पाण्यात होडी घातली. आणि त्या मनोरुग्णला होडीत ओढले. पोलिस पाटील राजप्रसाद राऊत यांनी नाटे पोलिसांना याबाबतची खबर दिली. ए.एस.आय .संजय झगडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या व्यक्तीला जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. हा मनोरुग्ण मूळ धाउलवल्ली पारवाडी येथील असून अनेक वर्षापासून कोल्हापूर येथे वास्तव्यास असल्याचे समजले.
कोल्हापूर येथून गेल्या अनेक दिवसापासून संदेश रामनाथ पारकर हा बेपत्ता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी नाटे पोलीस स्टेशनला त्याच्या विषयी माहिती मिळालेली होती मात्र तो परिसरात सापडला नव्हता.
त्याचे नातेवाईक दोन-तीन वेळा येऊन शोधून गेले होते.
आज सकाळी त्याने जैतापूर खाडी पुलावर वर येत थेट पाण्यात उडी मारल्याचे राज प्रसाद राऊत यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ होडी चालकांच्या मदतीने त्याला जीवनदान दिले आहे .
आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार केल्यानंतर दुपारी कोल्हापूर वरून त्यांचे नातेवाईक येऊन नाटे पोलीस स्थानकातून ताब्यात घेतले. गेल्या सहा वर्षांपासून तो मनोरुग्ण असल्याचे आणि त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. तशी कागदपत्रे दाखविली.
अनेक पुरस्कार प्राप्त कर्तव्यदक्ष पोलीस पाटील म्हणून नावलौकिक असलेले राजप्रसाद राऊत आणि त्या होडी चालकांमुळे मनोरुग्ण असलेल्या इसमला जीवदान दिल्याने दोघांचेही कौतुक होत आहे.