मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या मेळाव्यासाठी जमिनी देणाऱ्या 414 शेतकऱ्यांना राज्य सरकार 32 लाख रुपयांची भरपाई देणार आहे. जरांगे-पाटील यांनी 14 ऑक्टोबर रोजी त्यांच्या अंतरवली सराटे या गावी मोठ्या सभेला संबोधित केले होते. या रॅलीला लाखो मराठा समाज बांधव उपस्थित होते. एकूण 414 शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी रॅलीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांच्यापैकी काहींनी तर अर्धी तयार पिके आपल्या शेतातून साफ केली होती. या सभेच्या जागेचे नियोजन करण्यासाठी १७० एकर परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आलेले सोयाबीन व कपाशीसह लावलेली पिके उपटून सभेसाठी मैदान तयार करून दिले होते. हातातोंडाशी आलेलं पीक उपटून फेकताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी कुठलाच विचार केला नव्हता.
आता अशा शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाणार आहे. जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेण्यासाठी घातलेल्या अटींपैकी ही एक होती, असे मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रॅलीसाठी पिके काढून टाकणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कपाशीची पेरणी केली होती. अशा पिकांच्या नुकसानीच्या भरपाईच्या निकषांनुसार त्यांना भरपाई दिली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या १४ ऑक्टोबर रोजीच्या सभेला लाखोंच्या संख्येने आलेल्या जनतेने सोयाबीन, कपाशीचे उभे पीक तुडवून सभेची जागा गाठली. सभा निर्विघ्नपणे पार तर पडली पण गरीब शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेऊन सरकारने ३२ लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतलाय.
या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी काही स्थानिक शेतकरीही मदतीसाठी पुढे आले आहेत, असेही ते म्हणाले. त्यांना इतर स्थानिक शेतकर्यांकडून पेरणीसाठी बियाणे पुरवले जात आहे, असे अधिकारी म्हणाले. दरम्यान, मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.